मुंबई, दि.१५ ( प्रतिनिधी )
पंचमहाभूते फाउंडेशनतर्फे आयोजित ‘मुंबई फळोत्सव २०२५’ हा पर्यावरणस्नेही उपक्रम रविवारी (१५ जून) स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, दादर येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘एक पेड़ माँ के नाम’ व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘हरित महाराष्ट्र’ या संकल्पनांपासून प्रेरित होऊन हा उपक्रम राबवण्यात आला.
कार्यक्रमाला राज्यभरातील १५० सोसायट्यांमधील शेकडो पर्यावरणप्रेमींनी हजेरी लावली. यावेळी उपस्थित मान्यवरांमध्ये सावरकर स्मारकाचे अध्यक्ष रणजीत सावरकर, कोषाध्यक्ष मंजिरी मराठे, विधान परिषदेच्या सदस्या व भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ, अमली पदार्थ विरोधी शाखेचे समीर वानखेडे तसेच पंचमहाभूते फाउंडेशनचे संस्थापक अमित सावंत, संतोष सावंत, अमोल परब आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.
या उपक्रमाअंतर्गत हजारो फळझाडांचे विनामूल्य वाटप करण्यात आले. सहभागी प्रत्येक संस्था आणि व्यक्तीला प्रत्येकी पाच फळझाडे देण्यात आली. “ग्लोबल वॉर्मिंग आणि वाढते कार्बन उत्सर्जन पाहता, शहरी भागातही झाडांची लागवड गरजेची आहे,” असा संदेश यानिमित्ताने देण्यात आला.
पंचमहाभूते फाउंडेशनकडून ‘नो बाथ डे’, ‘टू मिनिट्स शॉवर’, ‘से नो टू प्लॅस्टिक’, अर्बन फॉरेस्ट, रेन वॉटर हार्वेस्टिंग, पर्क्युलेशन पिट्स, नेल फ्री ट्री इत्यादी उपक्रम नियमितपणे राबवले जातात. ‘पर्यावरण विघ्नहर्ता’ ही राज्यस्तरीय सजावट व मूर्ती स्पर्धा देखील संस्थेचा विशेष उपक्रम आहे.लोकसहभागातून पर्यावरण रक्षण आणि वृक्षप्रेम वाढविण्याचा हा प्रयत्न सर्व स्तरांतून अभिनंदनीय ठरतो आहे.




















