बारामती.दि.२८, ( प्रतिनिधी )
बारामतीत आज सकाळी घडलेल्या गंभीर विमान अपघाताने संपूर्ण राज्यात खळबळ उडवून दिली आहे. मुंबईहून बारामतीकडे येत असलेले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान लँडिंगदरम्यान अपघातग्रस्त झाले. प्राथमिक व अधिकृत सूत्रांनुसार या अपघातात सहा प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली असून, त्यामध्ये अजित पवार यांचाही समावेश असल्याचे सांगितले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आज बारामती तालुक्यात जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच प्रचार सभांसाठी अजित पवार यांचे चार कार्यक्रम नियोजित होते. त्यासाठी ते सकाळी विमानाने बारामती विमानतळावर येत होते. लँडिंगच्या वेळी विमान धावपट्टीवरून घसरले आणि बाजूला जाऊन जोरात आदळले. त्यानंतर विमानाला आग लागल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
प्रथमदर्शनी धावपट्टीवर विमान उतरवण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरल्यामुळे हा अपघात झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. अपघात इतका भीषण होता की विमानातील काही प्रवासी जागेवरच ठार झाल्याचे सांगण्यात येत आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिस, अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाली.
बचाव व शोध मोहीम सुरू करण्यात आली असून परिसरात मोठ्या प्रमाणात सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.
अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. तांत्रिक बिघाड, हवामान किंवा धावपट्टीशी संबंधित अडचण यापैकी कोणत्या कारणामुळे अपघात झाला, याबाबत चौकशी सुरू आहे.
नागरी नागर विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) घटनेची दखल घेत तपास सुरू केल्याची माहिती आहे.
दरम्यान, अपघाताची बातमी पसरताच बारामती विमानतळ परिसरात आणि आसपासच्या भागात नागरिकांची मोठी गर्दी जमली. राज्यातील राजकीय वर्तुळातही या घटनेमुळे तीव्र प्रतिक्रिया उमटत असून सर्वांचे लक्ष अधिकृत घोषणांकडे लागले आहे.




















