म्हाडा-अदाणी समूहात करार; देशातील सर्वात मोठ्या पुनर्विकास प्रकल्पाची सुरुवात..
मुंबई, दि.७ ( मंगेश म्हात्रे )
गोरेगाव (प.) येथील मोतीलाल नगर वसाहतीच्या (१, २ आणि ३) बहुप्रतिक्षित पुनर्विकास प्रकल्पाला अखेर गती मिळाली आहे. म्हाडा आणि अदाणी समूह यांच्यात या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी आज औपचारिक करार झाला. रहिवाशांना १६०० चौरस फुटांच्या अत्याधुनिक, सुसज्ज सदनिकांमध्ये मोफत पुनर्वसन करण्यात येणार आहे.
म्हाडा मुख्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल, अदाणी प्रॉपर्टीजचे संचालक प्रणव अदाणी आदी मान्यवर उपस्थित होते.
या वेळी बोलताना जयस्वाल म्हणाले, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री व गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे यांच्या दूरदृष्टीमुळे मोतीलाल नगरच्या रहिवाशांचे स्वप्न प्रत्यक्षात येणार आहे. हा प्रकल्प पारदर्शकतेने, गुणवत्तेने आणि सामाजिक बांधिलकी जपत पूर्ण केला जाईल.”
देशातील सर्वात मोठा पुनर्विकास प्रकल्प
१४२ एकर जमिनीवर उभारला जाणारा मोतीलाल नगरचा पुनर्विकास हा देशातील सर्वात मोठा कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट (सी एन्ड डी ) पद्धतीने होणारा प्रकल्प ठरणार आहे. यामध्ये सुमारे ३७०० रहिवासी गाळेधारकांचे पुनर्वसन साधारण ५.८४ लाख चौरस मीटर क्षेत्रावर होणार असून ९८७ व्यावसायिक गाळेधारकांनाही जागा दिली जाणार आहे.
सात वर्षांच्या कालावधीत प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असून, ‘१५ मिनिटांचे शहर’ या संकल्पनेवर आधारित असलेल्या या योजनेतून रहिवाशांना शाळा, हॉस्पिटल, उद्यान, मेट्रो स्टेशन, कार्यालये या सर्व सुविधा १५ मिनिटांच्या अंतरावर मिळणार आहेत.
पाच एकरचे मध्यवर्ती उद्यान, इमारतींवर सोलार पॅनल्स, रहिवाशांना प्रथम प्राधान्य व चोख वाहतूक नियोजन या प्रकल्पाची वैशिष्ट्ये असणार आहेत. अदाणी समूहाने प्रकल्पाचे नियोजन नेदरलँड्सच्या ‘मॅकेनो’ व लंडनस्थित ‘ब्युरो हॅप्पोल्ड’ यांच्यासारख्या आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांच्या मदतीने केले आहे.
या प्रकल्पातून म्हाडाला अतिरिक्त सुमारे ४ लाख चौरस मीटर जागेचा गृहसाठा मिळणार असून, भविष्यात गृहनिर्माणाच्या नव्या संधी निर्माण होतील. असे म्हाडाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.




















