मुंबई,दि.७ (प्रतिनिधी)
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित गट) चे नेते व माजी आमदार जीशान बाबा सिद्दीकी यांच्या वतीने, दरवर्षीप्रमाणे यंदाही मोहर्रमच्या पावन निमित्ताने मोफत दूध वितरणाचा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
वांद्रे (पूर्व) खेरवाडी येथील त्यांच्या कार्यालयात हा कार्यक्रम पार पडला. या वेळी परिसरातील हजारो रहिवाशांनी या उपक्रमाचा लाभ घेतला. मोहर्रमच्या श्रद्धा व सेवाभाव जपत जीशान बाबा यांनी मोफत दूध वाटप करून सामाजिक बांधिलकी जपली.
या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शेकडो कार्यकर्ते, पदाधिकारी व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी जीशान बाबा सिद्दीकी यांच्या या उपक्रमाचे कौतुक करत त्यांना शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्थानिक कार्यकर्त्यांनी मोठे योगदान दिले. मोहर्रमच्या निमित्ताने अशा सेवाभावी कार्यक्रमांनी सामाजिक सलोखा वृद्धिंगत होतो, असे मत नागरिकांनी व्यक्त केले.




















