अंगणवाडी, आशा, एनएचएम आणि पोषण आहार कर्मचाऱ्यांचा न्याय्य हक्कांसाठी एल्गार
मुंबई : अजय मगरे
पोषण, शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रातील महत्त्वाच्या शासकीय योजना तळागाळापर्यंत पोहोचवणाऱ्या हजारो योजना कर्मचाऱ्यांचा आक्रोश आता रस्त्यावर उमटणार आहे. सिटू (सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स) संलग्न विविध संघटनांच्या वतीने १ जूनपासून मुंबईतील आझाद मैदानावर ठिय्या आंदोलन सुरू होत असून अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा स्वयंसेविका, गटप्रवर्तक, राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कर्मचारी तसेच शालेय पोषण आहार कामगार मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.
राज्यभरातील लाखो महिला आणि बालकांना पोषण, आरोग्य व शिक्षणाच्या सेवा पुरविणाऱ्या कर्मचाऱ्यांना आजही कायमस्वरूपी दर्जा मिळालेला नाही. अंगणवाडी योजनेला ५० वर्षे, राष्ट्रीय आरोग्य अभियानाला २८ वर्षे आणि मध्यान्ह भोजन योजनेला ३६ वर्षे पूर्ण होऊनही केंद्र व राज्य शासन या योजनांकडे तात्पुरत्या स्वरूपातच पाहत असल्याचा आरोप सिटूने केला आहे.
या योजनांमध्ये ९० टक्क्यांहून अधिक महिला कार्यरत असूनही त्यांना शासकीय कर्मचारी म्हणून मान्यता, वेतनश्रेणी आणि सामाजिक सुरक्षेचे हक्क नाकारले जात असल्याचा संताप संघटनांनी व्यक्त केला आहे. योजनेच्या नावाखाली अल्प मानधन, अनियमित देयके, अतिरिक्त कामांचा बोजाबी आणि असुरक्षित रोजगार यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.
आंदोलनादरम्यान सर्व कामगारांसाठी किमान ३० हजार रुपये मासिक वेतन, कंत्राटी कर्मचाऱ्यांचे कायमस्वरूपीकरण, समान कामाला समान वेतन, ईएसआयसी, भविष्यनिर्वाह निधी, ग्रॅच्युइटी, पेन्शनसह सामाजिक सुरक्षा योजना लागू करण्याची मागणी करण्यात येणार आहे. तसेच केंद्र सरकारच्या कामगारविरोधी चार श्रमसंहितांची अंमलबजावणी थांबविण्याची मागणीही करण्यात येणार आहे.
अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी नियमित मानधन, भत्ते, वाय-फाय सुविधा, पोषक आहारासाठी वाढीव निधी, भाडेवाढ आणि निवृत्तीचे वय ६५ वर्षे करण्याची मागणी केली आहे. आशा व गटप्रवर्तकांनी शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा, थकीत मानधनाची तातडीने देयकपूर्ती, पगारी रजा, बोनस आणि मोबाईल रिचार्ज सुविधा देण्याची मागणी केली आहे. तर शालेय पोषण आहार कामगारांनी मानधनवाढीच्या निर्णयाची त्वरित अंमलबजावणी, १२ महिन्यांचे मानधन आणि गणवेशाची मागणी केली आहे.
या आंदोलनाला सिटूच्या केंद्रीय नेत्या उषा रानी तसेच मुंबईच्या निवृत्त प्राध्यापिका सुचिता कृष्णप्रसाद मार्गदर्शन करणार आहेत. शासनाने योजना कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष न दिल्यास राज्यव्यापी संघर्ष अधिक तीव्र करण्याचा इशाराही संघटनांनी दिला आहे.
सिटूचे राज्याध्यक्ष डॉ. डी. एल. कराड, राज्य सरचिटणीस एम. एच. शेख, राज्य उपाध्यक्ष डॉ. विवेक मॉन्टेरो यांच्यासह विविध योजना कर्मचाऱ्यांच्या संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. शासनाच्या धोरणांविरोधात आझाद मैदानावर १ जून रोजी हजारो योजना कर्मचारी एकत्र येणार असल्याने या आंदोलनाकडे राज्याचे लक्ष लागले आहे.




















