मुंबई, दि.५ : अजय मगरे
महसूल विभाग हा सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन गरजांसाठी कार्यरत असून नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी राज्य शासनाने १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत ‘सेवा पंधरवडा’ राबविण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. या कालावधीत शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे नियमातील तरतुदीनुसार नियमानुकूल करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिन (१७ सप्टेंबर) ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती (२ ऑक्टोबर) या दरम्यान हा ‘सेवा पंधरवडा’ साजरा केला जाणार आहे. याबाबत महसूल मंत्री बावनकुळे यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी अपर मुख्य सचिव विकास खारगे उपस्थित होते.
बावनकुळे म्हणाले की, “सेवा पंधरवड्यातील कार्यक्रम हे यापूर्वीपासून राबविले जात आहेत; मात्र या कालावधीत ते युद्धपातळीवर मोहीम स्वरूपात राबविले जातील.” हे अभियान तीन टप्प्यांमध्ये राबविले जाणार असून त्यामध्ये ‘पाणंद रस्तेविषयक मोहीम’, ‘सर्वांसाठी घरे’ उपक्रमासाठी पूरक उपक्रम तसेच जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून स्थानिक परिस्थितीशी सुसंगत नाविन्यपूर्ण उपक्रम या गोष्टींचा समावेश असेल.
‘सर्वांसाठी घरे’ या योजनेंतर्गत दुसऱ्या टप्प्यात (२३ ते २७ सप्टेंबर) शासकीय जमिनी घरे बांधण्यासाठी उपलब्ध करून देण्यात येतील. या कालावधीत अस्तित्वातील शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे नियमातील तरतुदीनुसार नियमित करण्यात येणार आहेत. जर आरक्षण विकास आराखड्याशी सुसंगत असेल तर शहरातील गायरान नोंदी कमी करून अतिक्रमणे नियमानुकूल केली जातील; अन्यथा आरक्षण बदलाचे प्रस्ताव सादर केले जातील.
याशिवाय, लाभार्थ्यांना शासकीय जमिनींचे पट्टे वाटप करून ‘सर्वांसाठी घरे’ या योजनेच्या उद्दिष्टपूर्तीस गती दिली जाईल, असेही महसूल मंत्री बावनकुळे यांनी सांगितले.




















