मुंबई, दि.१८ : मंगेश म्हात्रे
आगामी महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू होताच शहरातली राजकारणाची सरगर्मीही चढली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि मनसे युतीचे संकेत आता उघडपणे दिसू लागले आहेत. सायनच्या प्रतीक्षा नगरमधील एका बॅनरने तर राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे.
नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने शिवसेना ठाकरे गटाच्या वार्ड क्र. १७३ च्या शाखेसमोर लावण्यात आलेल्या बॅनरवर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचा एकत्र फोटो झळकला. आणि एवढ्यात परिसरात चर्चा रंगली – “ठाकरे बंधू खरंच एकत्र येणार..
गेल्या काही दिवसांपासून शिवसेना-मनसे युतीच्या चर्चांनी उकळी घेतली आहे. राज आणि उद्धव यांनी मात्र यावर मौन पाळले असले, तरी पक्षाच्या स्थानिक पातळीवरचे नेते आणि कार्यकर्ते “ठाकरे बंधू पुन्हा एकत्र आलेच पाहिजेत” अशी साद घालत आहेत.
प्रतीक्षा नगरमध्ये लावलेला हा बॅनर म्हणजे केवळ नवरात्रोत्सवाची शोभा की येऊ घातलेल्या राजकीय युतीची झलक, यावर चर्चां सुरू आहे. या विषयावर मनसे पदाधिकारी आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातील स्थानिक नेते युतीसाठीचा ग्राउंड तयार करण्याच्या हालचालीत असल्याची चर्चा आहे.
शहरातील गल्लीबोळापासून ते सोशल मीडियापर्यंत फक्त एकच कुजबुज – “राज-उद्धव एकत्र आल्यास मुंबईच्या महापालिकेचं गणित पालटणारच!”अशी प्रतिक्रिया सेना-मनसेचे कार्यकर्ते देत आहेत.




















