म्हाडा मुख्यालयात महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजवंदन
मुंबई, दि.१ ( मंगेश म्हात्रे )
महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६६ व्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईतील वांद्रे पूर्व येथील ‘म्हाडा’ मुख्यालयात आज सकाळी ध्वजवंदन सोहळा संपन्न झाला. ‘म्हाडा’चे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकविण्यात आला.
ध्वजवंदनप्रसंगी खेरवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस पथक, महाराष्ट्र सुरक्षा बल पथक आणि म्हाडातील सुरक्षारक्षकांनी राष्ट्रध्वजाला सलामी दिली. या सोहळ्याला म्हाडाचे विविध विभाग प्रमुख, अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपस्थित प्रमुख मान्यवरांमध्ये मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद शंभरकर, मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनिल वानखडे, ‘म्हाडा’च्या सचिव श्रीम. नीलिमा धायगुडे, सहमुख्य अधिकारी उमेश वाघ, श्रीम.वंदना सूर्यवंशी, कोकण मंडळाच्या मुख्य अधिकारी श्रीम. रेवती गायकर, मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळाचे मुख्य अधिकारी सतीश भारतीय, उपमुख्य अभियंता सुधीर पाटील, उपमुख्य अभियंता किशोरकुमार काटवटे, उपमुख्य अभियंता अनिल अंकलगी , उपमुख्य अभियंता दामोदर सूर्यवंशी, उपमुख्य अभियंत संतोष बोबडे, दक्षता अधिकारी महेश चव्हाण, महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या सदस्य सचिव श्रीम. नंदिनी आवाडे आदींसह इतर मंडळांचे अधिकारी आणि अभियंते यांचा समावेश होता.
या प्रसंगी संजीव जयस्वाल यांनी महाराष्ट्र दिन तसेच आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या आणि म्हाडाच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कार्याबद्दल कौतुक केले. कार्यक्रमाच्या शेवटी म्हाडाच्या कर्मचाऱ्यांनी देशभक्तिपर गीतांचे सादरीकरण करून वातावरण देशभक्तीमय केले.




















