धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासासाठी म्हाडाची जनजागृती मोहीम;
इमारत मालकांना पुढाकार घेण्याचे आवाहन
मुंबई,दि.८( मंगेश म्हात्रे )
मुंबईतील धोकादायक स्थितीत असलेल्या उपकरप्राप्त जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाला वेग देण्यासाठी म्हाडाकडून व्यापक जनजागृती मोहीम सुरू करण्यात आली आहे. तसेच इमारत मालक, भाडेकरू आणि सहकारी गृहनिर्माण संस्थांनी या प्रक्रियेत पुढाकार घ्यावा, असे स्पष्ट आवाहन म्हाडा कडून करण्यात आले आहे.
मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाच्या अखत्यारीतील सुमारे १३ हजार इमारतीं पैकी अनेक इमारती मोडकळीस आल्या असून, त्या नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण करत आहेत. म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली ५०० इमारतींच्या संरचनात्मक तपासणीचे आदेश देण्यात आले होते. आतापर्यंत ५५५ इमारती तपासण्यात आल्या असून, ५४० अहवाल प्राप्त झाले आहेत. तपासणी अहवालांनुसार धोकादायक इमारतींच्या तातडीच्या दुरुस्ती व पुनर्विकासासाठी आवश्यक ती पावले उचलली जात आहेत.
म्हाडा अधिनियम १९७६ मध्ये सुधारणा करून लागू करण्यात आलेल्या कलम ७९ अ नुसार, इमारत मालकांना भाडेकरूंच्या किमान ५१% अपरिवर्तनीय संमती नंतर सहा महिन्यांत पुनर्विकास प्रस्ताव सादर करण्याची संधी दिली आहे. प्रस्ताव न दिल्यास, सहकारी गृहनिर्माण संस्था पुढील सहा महिन्यांत तो प्रस्ताव सादर करू शकते. दोन्ही पक्षांपैकी कोणीही पुढाकार घेतला नाही, तर म्हाडा स्वतः ताबा घेऊन पुनर्विकासाची प्रक्रिया राबवू शकतात. अशा वेळी भाडेकरूंची स्वतंत्र संमती आवश्यक राहणार नाही.
शासनाने विकास नियंत्रण नियमावली ३३(७) आणि ३३(९) अंतर्गत अतिरिक्त एफएसआयसह विविध प्रोत्साहनांचा लाभ घेण्याची संधीही दिली आहे. त्यामुळे इमारत मालक, भाडेकरू आणि सहकारी संस्था यांनी लवकरात लवकर म्हाडाशी संपर्क साधून प्रस्ताव सादर करावा, असे आवाहन आर आर बोर्डाचे मुख्य अधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केले आहे.




















