मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ सुरूच राहणार
कोल्हापूर, दि २३ : राज्याच्या आणि देशाच्या आर्थिक प्रगतीत मोलाचा वाटा उचलणाऱ्या सहकार क्षेत्राच्या बळकटीसाठी सर्वतोपरी सहकार्य करू, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज येथे दिली. कागल तालुक्यातील विश्वनाथराव पाटील मुरगूड सहकारी बँकेच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की, शेतकरी, महिला व सामान्य जनतेच्या सक्षमीकरणासाठी शासन विविध योजना राबवत असून त्यात ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ सुरूच राहणार आहे. शेतकऱ्यांना शेतीपूरक व्यवसायांसाठी अनुदानाची कमतरता भासू दिली जाणार नाही. काळम्मावाडी धरणाच्या गळतीसाठी आवश्यक निधीची तरतूदही केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
ते पुढे म्हणाले, “सहकार चळवळीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्याची गरज आहे. विशेषतः कोल्हापुरातील शेतकऱ्यांनी शेतीमध्ये एआय (कृत्रिम बुद्धिमत्ता) चा वापर करून उत्पादन वाढवावे.”
या कार्यक्रमाला वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, बँकेचे चेअरमन प्रवीणसिंह पाटील, बिद्री साखर कारखान्याचे के.पी. पाटील, गोकुळ दूध संघाचे अरुण डोंगळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री पवार यांनी सहकार तत्त्वावर उभारलेल्या या बँकेच्या कार्याचे कौतुक करताना सांगितले की, “या बँकेच्या माध्यमातून सामान्य शेतकरी व व्यावसायिकांना आर्थिक पाठबळ मिळाले असून पुढे जाऊन ५० लाखांपर्यंत कर्ज देण्याचा विचार बँकेने करावा.”
कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज, फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचारांचा उल्लेख करत उपमुख्यमंत्र्यांनी सामाजिक समतेचे महत्त्व अधोरेखित केले. पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध करत त्यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’च्या यशस्वीतेचा उल्लेख केला आणि देश दहशतवादविरोधात ठाम असल्याचा पुनरुच्चार केला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रविणसिंह पाटील यांनी बँकेच्या वाटचालीचा आढावा घेतला व यशस्वीतेचे श्रेय सर्व संबंधित घटकांना दिले.




















