सिंदफणा नदीवरील तीन बंधाऱ्यांचे बॅरेजमध्ये रुपांतर; मंत्रिमंडळाची मान्यता….
पालकमंत्री अजित पवार यांच्या प्रयत्नांना यश…
मुंबई, दि. २६ : अजय मगरे
बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणारा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज घेण्यात आला. सिंदफणा नदीवरील निमगाव, ब्रम्हनाथ येळंब (ता. शिरुर कासार) आणि टाकळगाव (ता. गेवराई) येथील कोल्हापूर पद्धतीच्या तिन्ही बंधाऱ्यांचा विस्तार करून त्यांचे बॅरेजमध्ये रुपांतर करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
या निर्णयामुळे शिरूर-कासार व गेवराई तालुक्यातील शेतकऱ्यांना जलसंपन्नतेचा मोठा दिलासा मिळणार आहे. बॅरेज उभारल्यानंतर पाणीसाठ्यात वाढ होऊन विहिरी व बोअरवेलचा पाणीस्तर उंचावेल, भूजलस्तर सुधारेल आणि खरीप-रब्बी हंगामासाठी सिंचनास अधिक पाणी उपलब्ध होणार आहे.
शेतकरी व नागरिकांकडून या निर्णयाचे जोरदार स्वागत करण्यात येत असून, सातत्यपूर्ण पाठपुरावा करून हा निर्णय मिळवून देणाऱ्या उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांचे शेतकऱ्यांकडून आभार मानले जात आहेत.




















