दावरवाडी,दि.११.(अभिजीत सोनवणे)
दावरवाडी–सोनवाडी रस्त्यावर शेतात जाणाऱ्या महिला शेतकरी शारदाबाई भरत मोरे ( वय ३५) यांच्यावर दोन अज्ञात चोरट्यांनी हल्ला करून सोन्याचे दागिने लुटल्याची गंभीर घटना गुरुवारी दुपारी साडेबारा वाजता घडली.
शारदाबाई मोरे शेतात जात असताना चोरट्यांनी रस्त्यात अडवून त्यांच्या गळ्यातील सोन्याची पोत, कानातील कुडके आणि कर्णफुले जबरदस्तीने काढून घेतली. दागिने काढून देण्यास त्यांनी नकार दिल्यावर चोरट्यांनी त्यांना धमकावून कानातील कुडके अक्षरशः ओरबाडून काढले. या दरम्यान त्यांच्या उजव्या कानाचा खालचा भाग तुटून गंभीर जखम झाली. अंदाजित ५ ते ७ ग्रॅम सोन्याचे दागिने चोरट्यांनी लंपास केले.
घटनेनंतर त्यांनी फोनवरून कुटुंबियांना माहिती दिल्यावर ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली, पण तोपर्यंत चोरटे दावरवाडी मार्गे फरार झाले होते. जखमी शारदाबाईंना तात्काळ पाचोड ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
याची माहिती मिळताच पाचोड पोलिस ठाण्याचे सपोनि सचिन पंडित, उपनिरीक्षक राम बारहाते व पोलिस पाटील एकनाथ काशिद यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. घटनेमुळे परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या प्रकरणाचा तपास सपोनि सचिन पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक राम बारहाते करत आहेत.




















