शिवसेनेचा ऑन द स्पॉट निर्णय घेणारा सक्षम नगराध्यक्ष उमेदवार आपल्याकडे – नितीन औताडे….
कोपरगाव दि.१५ : दिलीप गायकवाड
कोपरगाव शहरावर बळजबरीने लादलेल्या काका आणि साहेब यांच्यासारख्या पंचतारांकित नेत्यांची गरज नाही. सामान्य जनतेच्या हक्कासाठी लढणारे, स्वच्छ प्रतिमेचे उमेदवार राजेंद्र झावरे यांनाच निवडून द्यावे, असे आवाहन महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख विमलताई पुंडे यांनी केले. शहरातील गजानन नगर तसेच प्रभाग क्रमांक ८ व १४ मध्ये आयोजित शिवसेना (शिंदे गट) उमेदवारांच्या प्रचारार्थ झालेल्या कॉर्नर सभांमध्ये त्या बोलत होत्या.
विमलताई पुंडे म्हणाल्या की, माजी नगराध्यक्ष राजेंद्र झावरे यांच्या २००१ ते २००६ या कार्यकाळात राज्यात सत्ता नसतानाही कोपरगाव शहरात ठोस विकासकामे झाली. संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज व्यापारी संकुल, नेहरू भाजी मंडई, विविध शॉपिंग कॉम्प्लेक्स उभारण्यात आले, तसेच छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आदी महापुरुषांचे पुतळे उभारण्यात आले. त्यामुळेच राजेंद्र झावरे यांना ‘कोपरगावचा विकासपुरुष’ म्हटले जाते. २००१ सारखी विकासाची पुनरावृत्ती करण्यासाठी त्यांना पुन्हा संधी द्यावी, असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, जिल्हाप्रमुख नितीन औताडे यांनी प्रस्थापित नेत्यांवर जोरदार टीका करताना सांगितले की, गेल्या ५० वर्षांपासून तालुका व नगरपालिकेची सत्ता काही मोजक्या कुटुंबांभोवती फिरत आहे. इतकी वर्षे सत्ता असूनही शहराचा विकास झाला नाही. निवडणुकीच्या वेळीच विकासाचे ‘व्हिजन’ दाखवले जाते. जर ४००० कोटींचा विकास झाला असता, तर आज एकही प्रश्न शिल्लक राहिला नसता. पाच वर्षांत १३१ कोटींची पाणी योजना पूर्ण होत नाही, मात्र इतर मोठे प्रकल्प वेळेत पूर्ण होतात, हेच अपयशाचे द्योतक आहे. कोपरगावमध्ये बदल हवा असेल, तर या प्रस्थापितांना हटवावे लागेल, असे औताडे म्हणाले.
शिवसेना (ए.शिंदे ) गटाचे कोपरगांव नगरपरिषद नगराध्यक्ष पदाचे उमेदवार राजेंद्र झावरे यांनी सांगितले की, योग्य नियोजन केल्यासच शहराला नियमित शुद्ध पाणी देता येते. त्यांच्या कार्यकाळात २००१ ते २००६ दरम्यान एक दिवस आड शुद्ध पाणी देणे शक्य झाले. शहराच्या सौंदर्यीकरणासह गटार, पूल, शॉपिंग कॉम्प्लेक्स आणि विविध विकासकामे केली. पुन्हा संधी दिल्यास यापेक्षा अधिक विकास करून दाखवू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.यामुळे दि.20 डिसेंबर रोजी धनुष्यबाण या चिन्हासमोरील बटण दाबून कोपरगांव नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूकीतील सर्व नगरसेवक आणि नगराध्यक्ष पदाचे उमेदवार मा राजेंद्र झावरे यांना प्रचंड मताधिक्यानी विजय करा असे शेवटी घोषित करण्यात आले यामुळे नगरीका मध्ये यामुळे अनेक उत्साह निर्माण झाला.
या सभांना जिल्हाप्रमुख नितीन औताडे, महिला आघाडी जिल्हाप्रमुख विमलताई पुंडे, उपजिल्हाप्रमुख, शहरप्रमुख, नगरसेवक पदाचे उमेदवार वर्षा शिंगाडे, किशोर (सनी) बाबुराव काळे, शंकर गंगुले, राठोड परीगाबाई, वैभव चव्हाण यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. राहुल देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले, तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मंगला पवार होत्या.




















