१० बिल्डरांविरोधात खेरवाडी पोलिसांत गुन्हा दाखल
मुंबई : मंगेश म्हात्रे
म्हाडाच्या संक्रमण शिबिरातील गाळ्यांचे तब्बल १२१ कोटी रुपयांचे भाडे थकविणाऱ्या १० बिल्डरांना चांगलेच महागात पडले आहे. वारंवार नोटिसा देऊनही त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या बिल्डरांना म्हाडाने चांगलाच दणका दिला आहे. या बिल्डरांविरोधात म्हाडाने खेरवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाच्या (आर.आर. बोर्ड) संक्रमण गाळे विभागाकडून पुनर्विकास प्रकल्पांसाठी विकासकांना तात्पुरते गाळे उपलब्ध करून देण्यात येतात. कमी दरात गाळे उपलब्ध होत असल्याने बिल्डर आपल्या ताब्यात आलेले गाळे परत म्हाडाला वेळेत देत नाहीत. म्हाडाकडून गाळे ठराविक अटी-शर्ती आणि मर्यादित कालावधीसाठी देण्यात येतात. मात्र काही बिल्डरांनी या गाळ्यांचे भाडे वर्षानुवर्षे भरले नाही. विशेष म्हणजे काही बिल्डरांनी कराराची मुदत संपल्यानंतरही गाळ्यांचा ताबा स्वतःकडे कायम ठेवला. तसेच वारंवार नोटिसा देऊनही थकीत रक्कम भरली नसल्याचे संबंधित विभागाच्या तपासात स्पष्ट झाले आहे.
या पार्श्वभूमीवर म्हाडाच्या दक्षता विभागाच्या सूचनेनुसार उपमुख्य अधिकारी मोहन बोबडे यांनी खेरवाडी पोलिस ठाण्यात अधिकृत तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी संबंधित १० बिल्डरांविरोधात गुन्हा नोंदवत पुढील तपास सुरू केला आहे.
दरम्यान, आर.आर. बोर्डाचे मुख्य अधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सांगितले की, संक्रमण गाळ्यांचे भाडे थकवणाऱ्या इतर बिल्डरांचीही माहिती तपासली जात आहे. ज्यांनी भाडे थकवले आहे त्यांच्यावरही कडक कारवाई करण्याचे आदेश संबंधिक विभागाला देण्यात आले आहेत.
विकासकाचे नाव. थकीत भाडे रक्कम
१. मे .९ एम. इन्फास्ट्रक्चर प्रा लि – ११,६५,७०,५००
२. मे. नाखवा अँड जसोल – १२,९१,८४८
३. मे. प्रदिप गोरा गांधी – २,७३,०३,५४३
४. मे. जे. के. बिल्डर्स – ८,००,४७,७०२
५. मे . अलहम्द – ५६,६५,२१०
६. में. वर्धमान- ३७,४२,२२,८१२
७. उदिती – ६०,१३.३६
८. संघवी प्रिमायसेस प्रा. लि. – १३,२०,३६.६९६
९ . आर. आर. बिल्डिर्स- ३५.६०,९१.३२३
१०. मे. हरे कृष्णा चापसी बिल्डिंग – ११,०८,१०,१०२




















