आमदार सुरेश भोळे (राजुमामा) यांना निवेदन; राज्यस्तरीय डिजिटल अभिलेखागार उभारण्याची अपेक्षा
मुंबई, दि. ४. (प्रतिनिधी):
राज्यातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती-भटक्या जमाती, इतर मागासवर्ग (OBC) तसेच विशेष मागास प्रवर्गातील नागरिकांना जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र मिळविताना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी आमदार यांच्याकडे निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनात जुन्या शालेय नोंदींचे डिजिटल जतन करून त्या जात पडताळणी प्रक्रियेत अधिकृत पुरावा म्हणून मान्यता देण्याची मागणी करण्यात आली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती-भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील नागरिकांसाठी १९५०, १९६१ आणि १९६७ किंवा त्यापूर्वीच्या शालेय नोंदी जात सिद्ध करण्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. मात्र, या नोंदी आजही बहुतांश शाळांमध्ये कागदी स्वरूपात असून त्या कालांतराने जीर्ण, अस्पष्ट किंवा नष्ट होण्याच्या स्थितीत आहेत. त्यामुळे पात्र नागरिकांना जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र मिळविताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
राज्यातील सर्व शासकीय, अनुदानित व खासगी शाळांमधील जुन्या प्रवेश नोंदवही, शालेय दाखले आणि संबंधित अभिलेखांचे तातडीने स्कॅनिंग करून त्यांचे सुरक्षित डिजिटल जतन करावे, राज्यस्तरीय डिजिटल अभिलेखागार उभारावे आणि नागरिकांना आवश्यकतेनुसार प्रमाणित डिजिटल प्रती उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच या डिजिटल नोंदींना जात प्रमाणपत्र व जात वैधता पडताळणी प्रक्रियेत अधिकृत पुरावा म्हणून मान्यता देण्याची मागणीही करण्यात आली आहे.
यासंदर्भात संबंधित मंत्री, प्रशासकीय अधिकारी, जात पडताळणी समित्यांचे प्रतिनिधी, शिक्षण विभागाचे अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांची संयुक्त बैठक तातडीने आयोजित करून आवश्यक धोरण निश्चित करावे, अशीही मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
या उपक्रमामुळे ऐतिहासिक अभिलेखांचे संरक्षण होईल, बनावट कागदपत्रे व जात घुसखोरीला आळा बसेल तसेच पात्र नागरिकांना न्याय मिळण्यास मोठी मदत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
हे निवेदन विजय माने, अध्यक्ष, ईशान्य मुंबई जिल्हा, रिपब्लिकन सेना यांनी सादर केले. यावेळी अमित साळुंखे, हर्षल पाटील, अॅड. सुमेश परमार, अॅड. श्याम शुक्ला, अॅड. मेघनाथ तेलावडे, राजेश शर्मा, अजय बरुचा आणि अश्विन पाटणे उपस्थित होते.




















