अंबरनाथ,दि.५.प्रतिनिधी
अंबरनाथ येथील शिवसेना गेट परिसराचे नगरसेवक राजेंद्र वाळेकर यांनी पत्रकार परिषदेत आमदार डॉ. बाळाजी किनीकर यांनी महिलांविषयी केल्याचा आरोप असलेल्या कथित वादग्रस्त वक्तव्याचा तीव्र निषेध केला. महिलांबाबत अशा प्रकारची भाषा वापरणे अत्यंत अयोग्य असून त्यामुळे समाजाच्या भावना दुखावल्याचे त्यांनी सांगितले.
वाळेकर म्हणाले की, मुख्यमंत्री यांनी ‘लाडकी बहीण’ योजनेच्या माध्यमातून राज्यातील महिलांना सन्मान आणि आर्थिक आधार देण्याचे कार्य केले आहे. अशा वेळी त्याच पक्षातील लोकप्रतिनिधीकडून महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य झाल्याचे समोर येणे दुर्दैवी असल्याचे त्यांनी नमूद केले.
शिवसेनेची परंपरा ही महिलांचा सन्मान करणारी असल्याचे सांगत, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेला “८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण” हा विचार प्रत्येक शिवसैनिकासाठी मार्गदर्शक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. महिलांचा सन्मान व संरक्षण करणे हे प्रत्येक शिवसैनिकाचे कर्तव्य असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.
राजेंद्र वाळेकर यांनी सांगितले की, विविध वृत्तवाहिन्यांवर त्यांनी आमदार डॉ. बाळाजी किनीकर यांचे कथित वक्तव्य पाहिले असून त्यामध्ये महिलांविषयी आक्षेपार्ह शब्दांचा वापर करण्यात आल्याचा आरोप आहे. हे वक्तव्य महाराष्ट्रातील सर्व महिला, शिवसेना महिला पदाधिकारी व कार्यकर्त्या तसेच संपूर्ण समाजाचा अपमान असल्याचे त्यांनी म्हटले.
या प्रकरणाच्या निषेधार्थ शिवसेना महिला कार्यकर्त्यांनी शाखास्तरावर बैठक घेऊन काळ्या फिती बांधत निषेध व्यक्त केला. संबंधित वक्तव्याचा तीव्र निषेध करत आमदार डॉ. बाळाजी किनीकर यांनी महाराष्ट्रातील सर्व महिलांची बिनशर्त जाहीर माफी मागावी, अशी मागणीही वाळेकर यांनी केली.




















