रिक्षा-टॅक्सीवाल्यांनो, मराठी येत नसेल तर गाड्या थांबवा; उद्यापासून सरकारचा कडक निर्णय! – व्यावहारिक मराठी न बोलल्यास बॅज आणि परवाना थेट रद्द होणार – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा थेट इशारा; आरटीओत होणाऱ्या तपासणीचे होणार व्हिडिओ रेकॉर्डिंग
मुंबई : अजय मगरे
महाराष्ट्रात राहून मराठी भाषेचा अनादर करणाऱ्या आणि ‘मराठी बोलणार नाही’ अशी ऐट दाखवणाऱ्या अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांचे आता धाबे दणाणले आहेत. महाराष्ट्रात उद्योग, व्यवसाय आणि रोजगार करायचा असेल, तर मराठी भाषेचे व्यावहारिक ज्ञान असणे अनिवार्यच आहे. ज्या रिक्षा-टॅक्सी चालकांना व्यावहारिक मराठी बोलता येत नसेल, त्यांचे बॅज आणि परवाने निलंबित तसेच रद्द केले जातील, असा थेट आणि सडेतोड इशारा राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिला आहे. या नियमाची कडक अंमलबजावणी उद्या, २० ऑगस्टपासून संपूर्ण राज्यभरात सुरू होत आहे.
पहिली नोटीस, नंतर सरळ गाशा गुंडाळावा लागणार!
पत्रकार परिषदेत माहिती देताना परिवहन मंत्र्यांनी स्पष्ट केले की, ज्या चालकांना मराठी येत नाही, त्यांना आधी एक महिन्याची नोटीस दिली जाईल. या काळात त्यांनी मराठी शिकणे गरजेचे आहे. तरीही मराठी न शिकल्यास त्यांचा बॅज ३ महिन्यांसाठी निलंबित करण्यात येईल. यानंतरही जर कोणी जाणीवपूर्वक मराठी शिकण्यास नकार दिला, तर त्याचा बॅज आणि परवाना (लायसन्स) कायमचा रद्द केला जाईल. ‘मराठी बोलणार नाही’ अशी अरेरावी करणाऱ्या चालकांना आता कोणतीही मानवतावादी मुदत दिली जाणार नसून, त्यांच्यावर कायद्याचा बडगा उगारला जाईल, असा स्पष्ट संदेश शासनाने दिला आहे.
नवीन बॅज हवाय? मग आरटीओत कॅमेऱ्यासमोर मराठी बोलून दाखवा!
राज्यात आतापर्यंत तब्बल ९ लाख ६५ हजार रिक्षा-टॅक्सी परवाने देण्यात आले आहेत. मात्र यापुढे नवा बॅज आणि परवाना हवा असल्यास आरटीओ अधिकाऱ्याशी प्रत्यक्ष मराठीत संवाद साधावा लागणार आहे. चालक खरोखर मराठी बोलू शकतो की नाही, याची पडताळणी करण्यासाठी या संवादाचे व्हिडिओ रेकॉर्डिंग केले जाईल. मराठी ज्ञानाची खात्री पटल्यानंतरच हातामध्ये बॅज दिला जाईल!
अभियानाला प्रतिसाद, पण अरेरावी खपवून घेणार नाही!
महाराष्ट्राच्या भाषा आणि संस्कृतीचा स्वाभिमान प्रत्येकाने राखलाच पाहिजे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला असून तिचा प्रचार आणि प्रसार झालाच पाहिजे. कोकण मराठी साहित्य परिषद आणि मुंबई मराठी साहित्य संघाच्या वतीने चालवण्यात आलेल्या १०५ दिवसांच्या ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मराठी भाषा अभियाना’त तब्बल १ लाख ६५ हजार ६०० अमराठी चालकांनी मराठीचे धडे घेतले.
ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत या चालकांना प्रमाणपत्रे देऊन सन्मानित करण्यात आले. मात्र, जे अजूनही मराठी शिकण्यास टाळाटाळ करत आहेत, त्यांना महाराष्ट्राचा कायदा आणि मराठीचा खाक्या दाखवलाच जाईल!




















