धूळधाण झालेलं कोपरगाव ग्रामीण रुग्णालय!
रुग्ण, डॉक्टर्स आणि कर्मचारी त्रस्त; प्रशासनाचे दुर्लक्ष
कोपरगाव, दि. २३ (दिलीप गायकवाड)
कोपरगावमधील ग्रामीण रुग्णालय सध्या अक्षरशः धुळीच्या विळख्यात अडकले आहे. नव्या १०० खाटांच्या जिल्हा ग्रामीण रुग्णालयाच्या बांधकामामुळे सुरू असलेल्या खोदकामामुळे रुग्णालयातील वातावरण धुळीने ढवळून निघाले आहे. त्यामुळे रुग्ण, डॉक्टर्स आणि कर्मचारी त्रस्त झाले आहेत.

रुग्णालय शेजारी सुरू असलेल्या जेसीबी कामामुळे सततचा धूळ आणि आवाज यांचा मोठा त्रास होत आहे. याचा थेट परिणाम रुग्णसेवेवर होत असून, गंभीर आजाराने त्रस्त रुग्णांना धूळयुक्त वातावरणात उपचार घ्यावे लागत आहेत. डॉक्टर आणि अन्य आरोग्य कर्मचारीही या अस्वच्छतेमुळे त्रासून गेले आहेत.
रुग्णालयासमोरील रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात डंपर वाहतूक होत असल्यामुळे धूळ उडते आणि रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहनधारकांचे हाल होत आहेत. बाहेरून येणाऱ्या रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना या परिस्थितीचा मोठा सामना करावा लागत आहे.
वैद्यकीय अधिकारी डॉ. गिरीश यांनी यावर प्रतिक्रिया देताना सांगितले की, “ठेकेदारांना सूचना देण्यात आल्या असून काही दिवसांसाठी काम थांबवण्यास सांगितले आहे.” मात्र वैद्यकीय अधीक्षक श्रीमती वाणी नाशिकला असल्याने त्यांच्या कडून प्रतिक्रिया मिळू शकली नाही.

या बांधकामाविषयी माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे उपविभागीय अभियंता अनुपस्थित होते. उपस्थित अधिकारी आर. डी. चौधरी यांनी सांगितले की, अधिक माहिती उपविभागीय अधिकारी व्ही. बी. शिंदे यांच्याकडे आहे. परंतु तेही अनुपलब्ध असल्यामुळे प्रतिक्रिया मिळू शकली नाही.
या सर्व परिस्थितीमुळे रुग्णालय परिसरात आरोग्याचे गंभीर संकट निर्माण झाले असून, प्रशासनाचे याकडे होत असलेले दुर्लक्ष हा संतापाचा विषय बनला आहे. स्थानिक नागरिक आणि रुग्णांच्या नातेवाईकांकडून या संदर्भात तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.




















