विनापरवानगी भोंग्यांवर कठोर कारवाई – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई, दि. ११ मार्च ( प्रतिनिधी )
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सर्व प्रार्थनास्थळांवर भोंगे वाजविण्यासाठी परवानगी आवश्यक असून, रात्री १० ते सकाळी ६ या वेळेत भोंगे बंद ठेवण्याच्या नियमाचे पालन करणे बंधनकारक आहे. विनापरवानगी व नियमांचे उल्लंघन करणाऱ्या भोंग्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत स्पष्ट केले.
विधायक देवयानी फरांदे यांनी अनधिकृत भोंग्यांमुळे होणाऱ्या ध्वनी प्रदूषणाबाबत लक्षवेधी सूचना मांडली. त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, संबंधित पोलीस निरीक्षकांना आपल्या कार्यक्षेत्रातील भोंग्यांच्या परवानगी व नियमांचे पालन याबाबत जबाबदारी देण्यात आली आहे. जर तक्रार असूनही कारवाई करण्यात आली नाही, तर संबंधित पोलीस निरीक्षक जबाबदार राहतील.
राज्यात ध्वनी प्रदूषण नियंत्रणासाठी पर्यावरण (संरक्षण) कायदा १९८६ व ध्वनी प्रदूषण (विनियमन व नियंत्रण) अधिनियम २००० नुसार कार्यवाही केली जात आहे. दिवसा ५५ डेसिबल आणि रात्री ४५ डेसिबल ही आवाजाची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. सर्व पोलीस ठाण्यांना आवाज मोजण्याची यंत्रे उपलब्ध करून देण्यात आली असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांचे भोंगे जप्त करण्यात येणार आहेत.
ध्वनी प्रदूषणाच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे अहवाल पाठवण्यात येईल आणि आवश्यकतेनुसार न्यायालयात खटला दाखल करण्यात येईल, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.




















