राज्यस्तरीय वैखरी पुरस्कार प्रदान सोहळा उत्साहात संपन्न
ठाणे दि. ११ मार्च ( अजय मगरे )
सहकार महर्षी स्वर्गीय भास्कररावजी शिंगणे कला महाविद्यालय, खामगाव येथे दिनांक १७ फेब्रुवारी रोजी मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून राज्यस्तरीय वैखरी पुरस्कार प्रदान सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.

या सोहळ्यात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते विविध साहित्यिकांना सन्मानित करण्यात आले. विशेष म्हणजे, प्रख्यात साहित्यिक डॉ. बाबाभांड यांना “राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जीवन गौरव पुरस्कार” प्रदान करण्यात आला.
यासोबतच, बदलापूर येथील सुप्रसिद्ध कवी वसंत मोरे यांच्या “अनघा” या कादंबरीचे प्रकाशनही या सोहळ्यात संपन्न झाले. यापूर्वीही त्यांचे “सरला” आणि “कांचन” हे दोन काव्यसंग्रह प्रकाशित झालेले आहेत.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संचालक डॉ. सद्गुणराव देशमुख होते. त्यांच्यासह प्रा. डॉ. निलिमा देशमुख आणि अन्य मान्यवरांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. प्रमुख पाहुण्यांच्या प्रेरणादायी भाषणांनी संपूर्ण सोहळा भारावून गेला.
कार्यक्रमाचे प्रमुख संयोजक प्रा. डॉ. सुनील पवार यांनी उत्कृष्ट नियोजन केले, तर हर्षा ढाले यांनी प्रभावी सूत्रसंचालन करून सोहळ्याला रंगत आणली. संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.




















