स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालयाचे काम दर्जेदार पद्धतीने व्हावे – उपमुख्यमंत्री अजित पवार
मुंबई, दि. २६ : अजय मगरे
“मराठवाड्यातील ग्रामीण भागातील आरोग्य सेवा व वैद्यकीय शिक्षण अधिक सक्षम करण्यासाठी बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथे १ हजार १५० खाटांचे सुसज्ज शासकीय रुग्णालय उभारले जाईल. तसेच देशातील पहिले ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय म्हणून ओळख असलेल्या स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालयाचे काम उच्च दर्जाच्या पद्धतीने करावे,” अशा स्पष्ट सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिल्या.
अंबाजोगाई वैद्यकीय महाविद्यालयाच्या कामाबाबत मंत्रालयात झालेल्या बैठकीत पवार बोलत होते. यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव धीरज कुमार, वित्त विभागाच्या सचिव शैला ए, संचालक डॉ. अजय चंदनवाले, अधिष्ठाता डॉ. शंकर धपाटे, तसेच संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, “अंबाजोगाई वैद्यकीय महाविद्यालयाचे रूपांतर आदर्श शासकीय संस्थेत करणे हा शासनाचा उद्देश आहे. या महाविद्यालयासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही. सुरू असलेल्या आणि पूर्ण झालेल्या कामांचा समावेश करून नवीन मास्टर प्लॅन तयार करावा. नवीन रुग्णालयात सुपर स्पेशालिटी विभाग, आधुनिक यंत्रसामग्री आणि उत्कृष्ट सुविधा असाव्यात. मराठवाड्यातील रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्याचा प्रस्ताव सादर करावा आणि हे काम नियोजनबद्ध व तातडीने पूर्ण करावे.”
यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले की, “अंबाजोगाईतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा दर्जा उंचावण्यासाठी कार्यवाहीला गती दिली जाईल. लवकरच महाविद्यालयाचा आराखडा तयार करून आवश्यक ती पावले उचलली जातील.”
या निर्णयामुळे मराठवाड्यातील रुग्णांना अत्याधुनिक उपचारांची सोय होणार असून, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी वैद्यकीय शिक्षणाच्या नव्या संधी निर्माण होतील. मोठ्या प्रमाणावर तज्ज्ञ सेवा आणि सुपर स्पेशालिटी उपचार ग्रामीण जनतेच्या दारात उपलब्ध होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.




















