पैठण,१९ .( अभिजित सोनवणे )
तालुक्यातील तोंडोळी, लोहगाव, ७४ जळगाव, ढाकेफळ व परिसरातील नागरिकांनी अखेर सुटकेचा निश्वास सोडला आहे. अनेक दिवसांपासून नागरिक व शेतकऱ्यांना धास्तावून टाकणारा बिबट्या सोमवारी अनावधानाने जाळ्यात अडकला.

गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचे दर्शन होणे, त्याचे हल्ले होणे यामुळे शेतकरी वर्ग शेतात काम करण्यासही टाळाटाळ करत होता. वनविभागाचे प्रयत्न वारंवार अपयशी ठरत असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, तोंडोळी परिसरातील प्रल्हाद गुंजाळ यांच्या शेतातील झाडीत कुणीतरी रानडुकरे पकडण्यासाठी लावलेल्या जाळ्यात हा बिबट्या अडकला. सोमवारी बकऱ्या चरणाऱ्यांना झाडीतून आवाज ऐकू आला. तपास केला असता रानडुकरासोबत बिबट्याही जाळ्यात अडकलेला दिसला. गावात बातमी पसरताच शेतात बघ्यांची मोठी गर्दी झाली.
ग्रामस्थांनी सरपंच संजय गरड यांना माहिती दिल्यानंतर वनविभागास कळविण्यात आले. तत्काळ वनपरिमंडळ अधिकारी अलका राठोड, वनरक्षक भारत पवार, प्रशांत निकाळजे, विश्वास साळवे, भीमराव चव्हाण तसेच पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. नागरगोजे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी भुलीचे औषध देऊन बिबट्याला सुरक्षितरीत्या ताब्यात घेतले.
बिबट्या जेरबंद झाल्याने शेतकरी व कामगार वर्गामधील दहशत दूर झाली असून ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला आहे.




















