ठाणे, दि. १ : अजय मगरे
ठाणे महापालिका क्षेत्रात पाचव्या दिवसाच्या गणेश मूर्तींचे विसर्जन रविवारी भक्तीमय वातावरणात संपन्न झाले. ढोल-ताशांच्या गजरात, गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात भाविकांनी आपल्या बाप्पाला निरोप दिला.
महापालिका प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, यंदा पाच दिवसांच्या कालावधीत एकूण ८९८४ गणेश मूर्तींचे विसर्जन झाले आहे. त्यापैकी ४८११ शाडू मातीच्या तर ४१७३ पीओपीच्या मूर्ती होत्या.
पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी महापालिकेने उभारलेल्या कृत्रिम तलावांमध्ये विसर्जनाला यंदाही चांगला प्रतिसाद मिळाला. भाविकांनी उत्स्फूर्तपणे कृत्रिम तलावांचा वापर करून पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला.
महापालिका प्रशासनाच्या स्वच्छता, सुरक्षा व वाहतूक व्यवस्थेमुळे विसर्जन सुरळीत पार पडले.




















