कोपरगाव: दिलीप गायकवाड
नाशिक–पुणे हायस्पीड रेल्वे ही देवठाण–बोटा स्टेशनसह पूर्वीच्या सर्वेप्रमाणेच व्हावी, या मागणीसाठी कोतुळ येथे रेल्वे हक्क परिषद झाली. परिषदेपूर्वी सुमारे चार हजार विद्यार्थ्यांची भव्य रॅली काढण्यात आली. विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्र्यांना हजारो पत्रे लिहून मिरवणुकीद्वारे पोस्टपेटीत टाकली.
बोटा येथे झालेल्या रास्ता रोकोदरम्यान १९ तारखेपूर्वी मुख्यमंत्र्यांशी चर्चा घडवून आणण्याचे आश्वासन देण्यात आले होते; मात्र अद्याप वेळ न दिल्याने आंदोलन तीव्र करण्याचा इशारा विनय सावंत यांनी दिला. परिषदेला सर्वपक्षीय कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
३१ जानेवारी रोजी सिन्नर तालुका रेल्वे कृती समितीच्या वतीने समृद्धी महामार्गावर रास्ता रोको करण्यात येणार असून, २५ जानेवारीला किसान सभेच्या नेतृत्वाखाली नाशिक ते मुंबई लॉन्ग मार्च काढण्यात येणार आहे. मागण्या मान्य न झाल्यास नाशिक, नगर व पुणे जिल्ह्यात एकत्रित आंदोलन छेडले जाईल, असा इशारा राज्य सचिव डॉ. अजित नवले यांनी दिला.




















