वंचित ६२ जागा लढवणार
इतर महापालिकांचा निर्णय स्थानिक पातळीवर…
मुंबई, दि.२८ : अजय मगरे
मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यात आघाडीचा निर्णय आज जाहीर करण्यात आला. या आघाडीनुसार मुंबईत वंचित बहुजन आघाडी ६२ जागांवर निवडणूक लढवणार आहे. राज्यातील इतर २८ महानगरपालिकांबाबत आघाडीचा निर्णय स्थानिक पातळीवर घेतला जाईल, असे अधिकार दोन्ही पक्षांनी आपल्या स्थानिक नेतृत्वाला दिले आहेत.
काँग्रेसच्या स्थापना दिनी हा निर्णय जाहीर झाल्याने त्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. धैर्यवर्धन पुंडकर यांनी टिळक भवन येथे संयुक्त पत्रकार परिषदेत आघाडीची घोषणा केली.
यावेळी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव व मुंबई काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते सचिन सावंत, काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष व मुख्य प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे, वंचितचे मुंबई अध्यक्ष चेतन अहिरे, मुंबई महिला आघाडी अध्यक्ष स्नेहल सोहनी, मुंबई युवा आघाडी अध्यक्ष सागर गवई आदी उपस्थित होते.
पत्रकार परिषदेत बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी ही नैसर्गिक व वैचारिक युती आहे. दोन्ही पक्ष संविधानवादी असून समता, बंधुता आणि सामाजिक न्याय या मूल्यांवर ठाम आहेत. संविधानाशी तडजोड न करणारा भारत घडवणे हा दोघांचाही समान विचार आहे. १९९८-९९ नंतर तब्बल २५ वर्षांनी हे दोन्ही पक्ष पुन्हा एकत्र आले असून, आजपासून राज्याच्या राजकारणात नव्या पर्वाला सुरुवात झाली आहे. हा केवळ आकड्यांचा खेळ नसून विचारांचा मेळ आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. धैर्यवर्धन पुंडकर म्हणाले, देशविघातक भाजपला रोखण्यासाठी ही आघाडी आवश्यक होती. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पुढाकार घेऊन सकारात्मक भूमिका घेतली. मुंबई महानगरपालिकेत वंचित ६२ जागांवर निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, सिद्धार्थ मोकळे यांनी सांगितले की, आघाडीत जागावाटपाची चर्चा कधीही पूर्ण समाधानकारक होत नसते; मात्र परस्पर समजुतीतून निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई महापालिकेसाठी आघाडी जाहीर झाली असून इतर महापालिकांबाबत स्थानिक नेतृत्व निर्णय घेईल, असे त्यांनी नमूद केले.



















