कोपरगाव, दि.१६ ( दिलीप गायकवाड )
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा वर्धापन दिन मुंबईत मोठ्या उत्साहात साजरा होणार असून, या कार्यक्रमात कोपरगावचे माजी शहरप्रमुख भरत मोरे हे सहभागी होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
कोपरगाव तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्था, ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद तसेच आगामी नगरपरिषद निवडणुकांमध्ये पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या धोरणानुसारच सर्व कार्यवाही केली जाणार आहे, असेही भरत मोरे यांनी स्पष्ट केले. कोपरगाव नगरपरिषद आणि ग्रामपंचायत निवडणूक या आमच्या विशेष लक्षात आहेत, असे ते म्हणाले.
शिवसेनेच्या (उबाठा) भूमिकेवर कोपरगाव तालुक्यातील जनतेचा विश्वास वाढत असून, मागील विधानसभा निवडणुकीतील अनुभव पाहता, लोकांमध्ये सत्ताधाऱ्यांविषयी नाराजी आहे. उद्धव ठाकरे यांच्यावर महाराष्ट्रभर विश्वास कायम असून, आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत शिवसेनेचा भगवा पुन्हा झळकणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
भरत मोरे हे शिवसेनेचे निष्ठावान कार्यकर्ते असून, त्यांच्या पत्नी सौ. सपना मोरे सध्या दुसऱ्यांदा नगरसेवक म्हणून कार्यरत आहेत. आगामी कोपरगाव नगरपरिषद निवडणुकीत पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
सध्या भरत मोरे हे कोपरगाव एस.टी. आगार कामगार सेनेचे अध्यक्ष आहेत. मराठी चित्रपट सृष्टीत लेखक व निर्माते म्हणून त्यांची ओळख असून, मसुटा आणि मास्क हे त्यांचे चित्रपट प्रसिद्ध आहेत. ते प्रेरणादायी व्याख्याने (Motivational Speeches) देतात. १९९० पासून त्यांची नाळ शिवसेनेशी जोडलेली आहे.
दरवर्षीप्रमाणे, मुंबईत होणाऱ्या शिवसेना वर्धापन दिन कार्यक्रमात सहभाग नोंदविण्याआधी भरत मोरे कोपरगाव येथील कार्यकर्त्यांना भेटतात. विशेष म्हणजे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहातील विद्यार्थ्यांना भोजनदान करत या सामाजिक कार्याचीही परंपरा त्यांनी कायम ठेवली आहे.
“कोपरगाव तालुक्यातील सर्व कार्यकर्ते आणि नेते एकविचारी असून, व्यक्तिगत मतभेद बाजूला ठेवून आम्ही सामाजिक कार्यात एकत्र येतो. आगामी सर्व निवडणुका आम्ही जोमाने लढवणार आहोत,” असेही त्यांनी सांगितले.
या मेळाव्यात अस्लम शेख, जगन हट्टा, भूषण पाटणकर, मुन्ना मसुरी, अमित भास्कर, सौरभ वालझडे, आकाश कानडे, वाल्मिक चिने, सोनु पाठक, यश मोरे आदी कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.




















