गृह राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांचा विधान परिषदेत इशारा
मुंबई : प्रतिनिधी
राज्यात हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये परवानगीशिवाय मद्य आढळल्यास संबंधितांचे परवाने रद्द करण्याबरोबरच स्थानिक पोलिसांनाही जबाबदार धरून कारवाई करण्यात येणार असल्याचा कडक इशारा गृह राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी विधान परिषदेत दिला.
“ज्या परिसरात असा बेकायदेशीर प्रकार घडेल, त्या भागातील पोलीस व प्रशासनातील अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित केली जाईल. केवळ मालकांवरच नाही, तर संबंधित यंत्रणेलाही उत्तरदायी ठरवले जाईल,” असे ठणकावून सांगत भोयर यांनी कारवाईची दिशा स्पष्ट केली.
सदस्य दादाराव केचे यांनी आर्वी (जि. वर्धा) येथील हॉटेलमधील अवैध व्यवसायाचा मुद्दा उपस्थित केला होता. या चर्चेत शशिकांत शिंदे यांनीही सहभाग घेत सरकारला जाब विचारला.
या संदर्भात बोलताना भोयर म्हणाले की, आर्वी तालुक्यातील हॉटेल्सबाबत आलेल्या तक्रारींची सखोल चौकशी करण्यात आली असून सध्या तरी कोणताही गैरप्रकार आढळलेला नाही. मात्र, लोकप्रतिनिधींच्या सूचनांची दखल घेत प्रकरणाची पुन्हा नव्याने चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
ही चौकशी अतिरिक्त पोलिस अधीक्षकांच्या माध्यमातून होणार असून, त्यात कुणीही दोषी आढळल्यास कठोर कारवाई केली जाईल, अशी ठोस ग्वाहीही त्यांनी दिली.
बेकायदेशीर धंद्यांना आळा घालण्यासाठी सरकारची ‘झिरो टॉलरन्स’ भूमिका स्पष्ट झाली असून, पोलिस यंत्रणेलाही आता जबाबदारीची जाणीव ठेवावी लागणार आहे.




















