१ मे पर्यंत मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशारा
कोपरगाव, दि.८.( दिलीप गायकवाड )
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी (महावितरण)कडून करण्यात आलेल्या वीज दरवाढीविरोधात तसेच वीज बिलामधील अवाढव्य शुल्कांविरोधात ‘माझं गाव माझा अभिमान’ अभियानाने एल्गार पुकारला आहे. कोपरगाव तालुका व शहरातील जागरूक नागरिकांनी याबाबत तहसीलदार, कोपरगाव यांना निवेदन देत वीज दर कमी करण्याची मागणी केली आहे.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, महाराष्ट्रातील वीज दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. दिल्लीसारख्या राज्यात ४०० युनिटपर्यंतच्या वापरावर सवलत देण्यात येत असल्यामुळे तेथील नागरिकांना कमी बिल भरावे लागते. मात्र महाराष्ट्रात तितक्याच वापरासाठी १२०० ते १५०० रुपये बिल येत असल्याने सामान्य कुटुंबांचे आर्थिक गणित बिघडत आहे.
या पार्श्वभूमीवर नागरिकांनी प्रशासनाकडे काही महत्त्वाच्या मागण्या मांडल्या आहेत. दिल्लीच्या धर्तीवर महाराष्ट्रातही २०० युनिटपर्यंत वीज मोफत देण्यात यावी किंवा बिलामध्ये किमान ५० टक्के सवलत द्यावी, वीज बिलातील ‘वहन आकार’ तातडीने रद्द करावा, मीटर रीडिंग न घेता अंदाजे बिले पाठवण्याचे प्रकार थांबवून प्रत्यक्ष रीडिंगनुसारच बिल द्यावे, तसेच वीज बिलातील ‘स्थिर आकार’ कमी करून पारदर्शक पद्धत लागू करावी, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.
दरम्यान, या मागण्यांकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष न दिल्यास येत्या १ मे , २०२६ (महाराष्ट्र दिन) पर्यंत निर्णय न झाल्यास कोपरगाव तहसील कार्यालयासमोर समस्त वीज ग्राहकांच्या वतीने तीव्र धरणे आंदोलन छेडण्याचा इशारा माझं गाव माझा अभिमानचे नेते, विनय भगत,आणि सहकार्यानी दिला आहे.




















