मुंबई,दि.२१ : अजय मगरे
आगामी गणेशोत्सव २०२५ निमित्त कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना मोठा दिलासा देणारा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या परिपत्रकानुसार २३ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर २०२५ या कालावधीत कोकण मार्गावरील महत्त्वाच्या महामार्गांवरून जाणाऱ्या वाहनांना तसेच राज्य परिवहन महामंडळाच्या (एस.टी.) बसेसना पथकर (टोल) माफी देण्यात येणारा शासन निर्णय गुरुवारी काढण्यात आला.
या रस्त्यांवर टोलमाफी लागू –
मुंबई–बेंगळुरू राष्ट्रीय महामार्ग (एनएच-४८)
मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्ग (एनएच-६६)
सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अखत्यारीतील रस्ते
वाहनांसाठी विशेष पास –
गणेशभक्तांच्या वाहनांना “गणेशोत्सव २०२५ – कोकण दर्शन” अशा आशयाचे स्टीकर पास देण्यात येतील. या पासवर गाडी क्रमांक व चालकाचे नाव नमूद असेल. हे पास संबंधित पोलीस स्टेशन, वाहतूक पोलीस चौक्या व आर.टी.ओ. कार्यालयांमध्ये उपलब्ध होतील.
हे पास परतीच्या प्रवासालाही ग्राह्य धरले जातील.
एस.टी. बसेसना जिल्हानिहाय पोलीस व परिवहन खात्यामार्फत पास वितरित केले जातील.
जनतेसाठी सुविधा व माहिती-
पोलीस व परिवहन विभागाने या पासच्या सुविधेबाबत जनतेला अवगत करण्यासाठी जाहीरात व अधिसूचना काढाव्यात, अशा सूचना शासनाने केल्या आहेत.
प्रत्येक जिल्ह्यातून दिलेल्या पासांची एकत्रित माहिती मंत्रालयात सादर केली जाणार आहे.




















