उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
खड्डे मुक्तीसाठी उत्तम तंत्रज्ञान वापरण्यावर भर
ठाणे, दि.४ : अजय मगरे
ठाणे आणि परिसरातील वाढती वाहतूक कोंडी ही गंभीर समस्या बनली असून नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. ही समस्या तातडीने सोडवण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी एकत्रित समन्वय साधावा, असे स्पष्ट निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.
ठाण्यात कोपरी, माजिवडा, घोडबंदर रस्ता, गायमुख घाट ते फाउंटन हॉटेल मार्ग आणि शिळफाटा परिसरात दररोज सकाळ-संध्याकाळच्या वेळेस मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असून नागरिकांमधून सतत तक्रारी येत आहेत. या पार्श्वभूमीवर आयोजित उच्चस्तरीय बैठकीत शिंदे यांनी वाहतूक व्यवस्थापनातील अपयशावर नाराजी व्यक्त केली.
या बैठकीला ठाण्याचे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्णनाथ पांचाळ, ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव, पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, वाहतूक पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता सिद्धार्थ तांबे यांना दूरध्वनीद्वारे सूचनाही देण्यात आल्या.
गायमुख घाट येथील वाहतूक कोंडीची समस्या अद्याप सुटलेली नाही याकडे लक्ष वेधत शिंदे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच, ठाणे, भिवंडी, शिळफाटा आणि कोपरी परिसरात वाहतुकीचे योग्य नियोजन करून कोंडीवर कायमस्वरूपी उपाययोजना राबवाव्यात, असेही त्यांनी स्पष्ट केले.
रस्त्यांचे दर्जेदार डांबरीकरण करणे, उंचवटे तयार होऊ न देणे आणि अपघातांची शक्यता टाळणे या बाबींवर विशेष भर द्यावा, अशी सूचनाही त्यांनी केली. खड्डे मुक्ती हे वाहतूक सुरळीत करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे पाऊल असल्याने, उपलब्ध असलेले आधुनिक व कार्यक्षम तंत्रज्ञान वापरून हे काम तत्काळ पूर्ण करावे, अशा स्पष्ट सूचना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठकीदरम्यान दिल्या.




















