नांदर गणात `हायव्होल्टेज लढत; उत्सुकता वाढल्याचे दिसून येत आहे!
दावरवाडी.दि.४,( अभिजीत सोनवणे )
पैठण तालुक्यातील दावरवाडी जिल्हा परिषद गटात निवडणूकीची रणधुमाळी शिंगेला पोहचली आहे. या गटात शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप पुरस्कृत अपक्ष आणि राष्ट्रीय समाज पक्ष या चार पक्षांच्या उमेदवारांमध्ये अटीतटीची चौरंगी लढत होत आहे. सध्या सुगीचे दिवस डोक्यावर असतांना उमेदवारांची मतदारांच्या भेटीसाठी दमछाक होत असुन, सकाळी ९ च्या आत आणि संध्याकाऴी ६ नंतर प्रचाराचा खरा जोर पाहायला मिळत आहे. मागील पंचवार्षिकला दावरवाडी गट शिवसेनेकडे होता. यावेळी हा गट ओबीसी महिलेसाठी राखीव झाल्याने शिंदेसेनेने दावरवाडी सोसायटीचे चेअरमन राजेंद्र वाघमोडे यांच्या पत्नी जयश्री वाघमोडे यांना उमेदवारी दिली आहे.
तर एकीकडे उद्धवसेनेने अर्चना चंद्रशेखर सरोदे, भाजपने अपक्ष कु. प्रतिक्षा भगवान तांगडे, यांना पुरस्कृत केले आहे. राष्ट्रीय समाज पक्षाने सौ. कांताबाई देविदास सोनवणे यांना उमेदवारी दिली आहे. एकुण २४ गावे असलेल्या या विस्तीर्ण राजकीय प्रतिष्ठा, कौटुंबिक वारसा आणि समीकरणांची मोठी गोळाबेरीज होत आहे.
पंचायत समिती गणात राजकीय वारसांची कसोटी!
नांदर गणातुन उध्दव सेनेकडुन डॉ. सुनिल शिंदे यांच्याविरोधात शिंदेसेनेकडुन माजी आमदार स्व. शिवाजीराव काळे यांचे नातु तथा शिवाजी बैंकेचे चेअरमन रविंद्र दादा काळे यांचे पुतणे उदयसेन रामचंद्र काळे हे आहेत ‘ या दोन उमेदवारांमध्ये हायव्होलटेज, अटीतटीचा सामना होत आहे. तर भाजप पुरस्कृत अपक्ष उमेदवार आकाश काळे हे देखील मैदानात उतरले आहेत.
दावरवाडी गणातही उध्दवसेनेच्या सुषमा वाघ, शिंदेसेनेच्या राहीबाई वाघ, आणि भाजप पुरस्कृत अपक्ष शोभा सोरमारे यांच्यात अटीतटीची लढाई सुरू आहे.
गटात या गांवाचा समावेश
दावरवाडी, नांदर, हर्षी बु, हर्षी खु, हर्षी बु, डेरा, नानेगाव, पुसेगाव, खेर्डा, ज्ञानेश्वरवाडी, खादगाव, यासीनपुर, थेरगाव, रहाटगाव, गावतांडा, सोलनापूर, आखातवाडा, करंजखेडा सोनवाडी खु, सोनवाडी बु, खेर्डा तांडा या गांवाचा समावेश आहे.


















