कोपरगाव, दि.२४ : दिलीप गायकवाड
कोपरगाव शहरातील धारणगाव रोडवर असलेल्या साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे खुले नाट्यगृहाजवळील वीज पोलवर झुकलेली झाडे नागरिकांच्या सुरक्षेसाठी धोकादायक ठरत आहेत. पावसाळी हवामानात वाऱ्याच्या जोरदार फटकाऱ्यामुळे झाडांच्या फांद्या व वीजतारा यांचा संपर्क होऊन मोठा विज अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
या परिसरातच वीज खांबांच्या खाली वडापाव, भजीपाव स्टॉल उभे करण्यात आले असून, येथे दिवस-रात्र नागरिकांची गर्दी होत असते. विशेषतः स्त्री-पुरुष, शालेय विद्यार्थी, तसेच आंबटशौकीन तरुणाईचा वावर मोठ्या प्रमाणात असल्याने अपघात झाल्यास गंभीर परिणाम होऊ शकतात.
या स्टॉलमुळे रस्त्यावर दुचाकी गाड्यांची गर्दी होऊन वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होत असल्याची तक्रार परिसरातील रहिवाशांनी केली आहे.
स्थानिक नागरिकांच्या मते, वाऱ्याच्या जोरदार फटकाऱ्यामुळे फांद्या आणि वीजतारा एकमेकांना घासून अपघात होऊ नये, यासाठी तातडीने झाडांची छाटणी करण्याची गरज आहे. या ठिकाणी वीज खांबाखाली काही खाद्यपदार्थांचे स्टॉल असल्याने येथे सतत गर्दी असते. त्यामुळे अपघात झाल्यास त्याचा फटका थेट सामान्यांना बसू शकतो.
नागरिकांनी असेही सांगितले की, वाहतुकीला अडथळा निर्माण करणारे स्टॉल्स व झाडांची धोकादायक फांदी याकडे संबंधित विभागाने लक्ष द्यावे. सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टीने योग्य ती कार्यवाही लवकर व्हावी, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.




















