हरिसन ब्रॅच चारी रस्त्याची तातडीने दुरुस्ती करा – शेतकरी दौलत वक्ते पाटील यांची मागणी
कोपरगाव, दि.२७ : दिलीप गायकवाड
जेऊर कुंभारी ग्रामपंचायत हद्दीतील हरिसन ब्रॅच चारी (पाठ) रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून, गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिक शेतकरी दौलत वक्ते पाटील यांनी केला आहे. हा रस्ता नगर–मनमाड महामार्गावरील तीनचारी तसेच नाशिक–शिर्डी बायपासला जोडणारा महत्त्वाचा मार्ग असून, वाहतूक कोंडीच्या वेळी पर्यायी मार्ग म्हणून वापरला जातो.

सध्या रस्त्यावर मोठे खड्डे, उचकलेली खडी आणि अरुंद रस्ता असल्यामुळे शेतकरी, ग्रामस्थ, विद्यार्थी व वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या मार्गावर शाळा व बसथांबा असल्याने शालेय मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही निर्माण झाला आहे. दिवाबत्तीची कोणतीही व्यवस्था नसल्याने रात्री अपघाताचा धोका वाढला असल्याचे पाटील यांनी सांगितले.
रस्त्याच्या दुरुस्तीसाठी आलेला निधी कुठे गेला, असा सवाल उपस्थित करत पाटील यांनी तात्काळ रस्ता दुरुस्त करण्याची मागणी केली आहे. ग्रामपंचायत, पंचायत समिती व गटविकास अधिकारी यांनी याकडे लक्ष न दिल्यास संबंधित वरिष्ठ कार्यालयांकडे लेखी तक्रार करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.



















