कोपरगाव, दि. १३ (दिलीप गायकवाड)
कोपरगाव शहरातील नगरपरिषदेच्या नवीन भव्य इमारतीचे बांधकाम जवळपास पूर्ण झाले असून, केवळ किरकोळ काम बाकी आहे. तरीदेखील या इमारतीचे उद्घाटन अद्याप न झाल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे.
धारणगाव मार्गावर तहसील कार्यालयासमोर उभी असलेली ही नवीन इमारत आधुनिक सोयींनी युक्त असूनही अद्याप वापरात आलेली नाही. सध्या नगरपरिषद जुन्या रुग्णालयाच्या इमारतीत कार्यरत आहे, मात्र तिथे कर्मचाऱ्यांना बसण्यासाठी पुरेशी जागा नाही. त्यामुळे नगरपरिषदेचे नवीन इमारतीत त्वरित स्थलांतर करावे, अशी नागरिकांची मागणी आहे.
नगरपरिषद प्रशासनाने या संदर्भात कोणतीही ठोस भूमिका घेतली नसल्याने नवीन इमारत तयार असूनही ती वापरात येऊ शकत नाही. या इमारतीत अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध असून नागरिकांसाठीही अधिक चांगल्या सेवा देण्याची क्षमता आहे. मात्र, उद्घाटन रखडल्याने इमारतीचा उपयोग होण्यास विलंब होत आहे.
या संदर्भात नगरपरिषदेचे मुख्य अधिकारी सुहास जगताप यांनी बहुजन शक्ती न्यूज २४ शी बोलताना सांगितले की,
“कोपरगाव नगरपरिषदची नवीन इमारत पूर्ण झाली आहे. सध्या आतील फर्निचर आणि किरकोळ कामे सुरू आहेत. लवकरच या नवीन कार्यालयाचे उद्घाटन करण्यात येईल.”
नागरिकांच्या मते नवीन इमारतीत नगरपरिषदेचे कामकाज सुरू झाल्यास प्रशासन अधिक सुसज्ज आणि कार्यक्षम होईल. त्यामुळे प्रशासनाने लवकरात लवकर उद्घाटन करून नवीन इमारतीचा वापर सुरू करावा, अशी नागरिकांची मागणी आहे.




















