ठाणे : अजय मगरे
ठाणे महानगरपालिकेच्या महापौर आरक्षण सोडतीत यंदाचे महापौरपद अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव झाल्याने शहराच्या राजकारणात मोठी हालचाल सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर वागळे प्रभाग क्रमांक १६ मधून अनुसूचित जाती प्रवर्गातून नवनिर्वाचित झालेल्या नगरसेविका डॉ. दर्शना योगेश जानकर यांच्या गळ्यात महापौरपदाची माळ पडण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.
महापौरपदाच्या शर्यतीत डॉ. जानकर यांचे नाव आघाडीवर असल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. सामाजिक कामाची भक्कम पार्श्वभूमी आणि पक्षातील मजबूत पाठबळ यामुळे त्यांची दावेदारी अधिक मजबूत मानली जात आहे. ठाणे महानगरपालिका रुग्णालयात डॉक्टर म्हणून सेवा बजावलेल्या डॉ. जानकर यांनी ‘साई दर्शन फाऊंडेशन’च्या माध्यमातून गरजू महिला व नागरिकांसाठी विविध उपक्रम राबवले आहेत. बचत गटांच्या माध्यमातून सुमारे अडीच हजार महिलांना त्यांनी संघटित केले असल्याचेही त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य मानले जाते.
दरम्यान, त्यांचे पती योगेश जानकर हे सलग तिसऱ्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आले असून ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. त्यामुळे सत्ताधारी गटाकडून डॉ. जानकर यांच्या नावाला अधिक प्राधान्य मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
आरक्षणाच्या गणितामुळे आणि राजकीय समीकरणांमुळे ठाण्याला पहिल्यांदाच महिला डॉक्टर महापौर मिळणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अंतिम निर्णय पक्षीय पातळीवर होणार असला तरी सध्याच्या घडीला डॉ. दर्शना जानकर यांचे नाव ‘महापौरपदासाठी प्रबळ दावेदार’ म्हणून पुढे येत असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.




















