मुंबई, दि.१४ : प्रतिनिधी
दलित पँथर चळवळीचा वर्धापन दिन यंदा एका आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात येणार आहे. दलित पँथरचे सहसंस्थापक, आंबेडकरी चळवळीचे भाष्यकार व ज्येष्ठ लेखक ज. वि. पवार यांच्या ८२व्या वाढदिवसाचं औचित्य साधून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
हा कार्यक्रम मंगळवार, १५ जुलै २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजता, राजर्षी शाहू महाराज सभागृह, तिसरा मजला, शिवाजी नाट्य मंदिर, दादर (प.), मुंबई येथे पार पडणार आहे.
यावेळी एका खास सत्रात ‘प्रश्न तुमचे : उत्तर ज. वि. पवारांचे’ या संकल्पनेतून प्रेक्षकांना थेट ज. वि. पवार यांना प्रश्न विचारण्याची संधी दिली जाणार आहे. आंबेडकरी चळवळीतील सहा दशकांच्या वाटचालीचे साक्षीदार असलेल्या पवारांनी चळवळ, साहित्य, इतिहास, राजकारण अशा अनेक विषयांवर दिलेलं योगदान अनमोल आहे.
पवार हे दलित पँथर चळवळीचे सहसंस्थापक, ‘प्रबुद्ध भारत’चे संपादक, महाड राष्ट्रीय स्मारकासाठी कविता लिहिणारे कवी, आंबेडकरोत्तर चळवळीचे पाच खंड लिहिणारे इतिहासकार, चार साहित्य संमेलनांचे अध्यक्ष, मास मुव्हमेंट व सम्यक क्रांतीचे प्रवर्तक अशा अनेक भूमिकांमधून आंबेडकरी विचारांचा प्रचार करत आले आहेत. त्यांनी लिहिलेले ४० हून अधिक ग्रंथ, दोन कवितासंग्रह, पन्नासहून अधिक ग्रंथांना प्रस्तावना तसेच आंबेडकर साहित्य समितीतून केलेलं कार्य आजही मार्गदर्शक ठरत आहे.
कार्यक्रमाचे आयोजन दलित युथ पँथरने केलं असून अध्यक्ष निलेश मोहिते यांनी आवाहन केलं आहे की, “कार्यक्रमास उपस्थित राहून चळवळीच्या या इतिहासपुरुषाला ऐकण्याची संधी गमावू नका. मात्र येताना हार, शाल, फुलं, शुभेच्छा गुच्छ घेऊन येऊ नये.”
संपर्क: ७४००००२५३५ / ७२०८००९२८४
(अध्यक्ष, दलित युथ पँथर : निलेश मोहिते)




















