मुंबई , दि. १२ ( प्रतिनिधी )
महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात द्यावा या मागणीसाठी बुद्धगयात सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भारतीय बौद्ध महासभा, वंचित बहुजन आघाडी आणि समता सैनिक दलाच्या वतीने मुंबईत भव्य मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते.

या आंदोलनाबाबत बोलताना दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया व भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ. भीमराव य. आंबेडकर म्हणाले,
“आम्ही कोणत्याही धर्माच्या विरोधात नाही. मात्र, देशात समता, न्याय, करुणा आणि बंधुता प्रस्थापित व्हावी, ही आमची मागणी आहे. देशाची प्रतिमा समतावादी असली पाहिजे.”

मोर्चाची सुरुवात बांद्रा येथील टीचर्स कॉलनीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्राला पुष्पहार अर्पण करून व सामूहिक महावंदना घेऊन करण्यात आली. त्यानंतर मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देण्यात आली.
या वेळी १९४९ चा महाबोधी मंदिर कायदा तात्काळ रद्द करावा आणि महाबोधी महाविहार बौद्ध समाजाच्या ताब्यात द्यावा, अशी प्रमुख मागणी करण्यात आली. डॉ. भीमराव आंबेडकर १८ व १९ मार्च रोजी बुद्धगया येथे आंदोलनात सहभागी होणार असल्याची घोषणाही त्यांनी केली.
मोर्चा समोर मार्गदर्शन करताना अॅड. एस. के. भंडारे म्हणाले,
“जोपर्यंत हा अन्यायकारक कायदा रद्द होत नाही आणि महाबोधी विहार बौद्धांच्या ताब्यात जात नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील.”
या वेळी भंते शांती रत्न, रेखा ठाकूर, भिकाजी कांबळे यांनीही मार्गदर्शन केले. नंतर डॉ. भीमराव आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांच्यामार्फत बिहारचे मुख्यमंत्री, राज्यपाल, राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांना निवेदन सुपूर्त केले.
या आंदोलनात भारतीय बौद्ध महासभेच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष सुषमा पवार, मुंबई प्रदेश अध्यक्ष विलास वानखडे, चंदा कासले, सरचिटणीस दयानंद बडेकर, उपाध्यक्ष प्रदीप कांबळे, कोषाध्यक्ष राजेंद्र सत्वधीर, सागर गांगुर्डे, महादेव गायकवाड, सिद्धार्थ अहिरे तसेच वंचित बहुजन आघाडीचे महेश भारतीय, परमेश्वर रणशूर आणि उत्कर्षा रूपवते आदी मान्यवर सहभागी झाले होते.
या भव्य मोर्च्यात भारतीय बौद्ध महासभा, वंचित बहुजन आघाडी आणि समता सैनिक दलाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले, आणि हा लढा अधिक तीव्र करण्याचा निर्धार करण्यात आला.




















