Lमुंबई, दि.१२ : अजय मगरे
राज्यातील पोलीस दलातील शिपाई संवर्गातील तब्बल १५ हजार पदांची भरती लवकरच होत असून, या प्रक्रियेला आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. बैठकीचे अध्यक्षस्थान मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भूषविले.
यामध्ये सन २०२२ व २०२३ मध्ये वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना एक वेळची विशेष सवलत देऊन अर्ज करण्याची संधी दिली जाणार आहे. भरती प्रक्रियेत जिल्हास्तरावर ओएमआर आधारित लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे.
भरतीची पदसंख्या :
पोलीस शिपाई – १०,९०८
पोलीस शिपाई चालक – २३४
बॅण्डस् मॅन – २५
सशस्त्री पोलीस शिपाई – २,३९३
कारागृह शिपाई – ५५४
भरतीसाठी अर्ज मागवणे, छाननी, शारीरिक चाचणी व लेखी परीक्षा यांसाठीचे अधिकार अतिरिक्त पोलीस महासंचालक (प्रशिक्षण व खास पथके विभाग) यांना देण्यात आले आहेत.
राज्यातील पोलीस दलातील शिपाई संवर्गाची पदे रिक्त राहिल्यामुळे कामाचा ताण वाढत असून, उच्च व सर्वोच्च न्यायालयानेही तातडीने भरती करण्याचे निर्देश दिले होते. तसेच, विधिमंडळातील चर्चेत आणि लोकप्रतिनिधींनीही ही पदे त्वरेने भरण्याची मागणी केली होती.
ही मेगा भरती मोहीम राज्यातील कायदा व सुव्यवस्था बळकट करण्यास आणि पोलिसांचा ताण कमी करण्यास महत्त्वपूर्ण ठरणार आहे.




















