मुंबई, दि. १२ ( प्रतिनिधी )
सायन कोळीवाडा झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाची कामे निर्धारित कालमर्यादेत पूर्ण करण्यासाठी विकासकांना अंतिम नोटीस देण्यात येईल. त्यानंतरही कामे अपूर्ण राहिल्यास संबंधित विकासकांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा खनिकर्म मंत्री शंभूराज देसाई यांनी विधानसभेत दिला.
यासंदर्भात विधानसभा सदस्य कॅप्टन आर. सेल्वन, राम कदम, मुरजी पटेल आणि असलम शेख यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. यावर उत्तर देताना मंत्री देसाई यांनी सायन-कोळीवाडासह बृहन्मुंबईतील विविध झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांच्या प्रगतीचा आढावा घेतला.
२३३ विकासक हटवले, १७ प्रकल्पांची नोंदणी रद्द
बृहन्मुंबईतील ५१७ झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांपैकी २३३ प्रकल्पांच्या विकासकांना हटविण्यात आले आहे, तर १७ प्रकल्पांमध्ये विकासकांची नोंदणी रद्द करण्यात आली आहे. तसेच, रखडलेल्या प्रकल्पांना चालना देण्यासाठी विकासकांसाठी विशेष अभय योजना लागू करण्यात आली असून, त्याअंतर्गत विशिष्ट अटींसह काही सवलती दिल्या जात आहेत.
उपमुख्यमंत्री कार्यालयात विशेष समन्वयक कक्ष
पुनर्वसन प्रकल्पांना वेग देण्यासाठी उपमुख्यमंत्री कार्यालयात विशेष समन्वयक कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या कक्षामार्फत प्रकल्पांचा नियमित आढावा घेतला जातो. रखडलेल्या प्रकल्पांमध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता असल्यास त्वरित त्या करण्यात येतील आणि प्रकल्पांना गती दिली जाईल, असेही मंत्री देसाई यांनी सभागृहात स्पष्ट केले.




















