चाळींच्या पोट माळ्यावर राहणार्यांना मोफत घर देण्याची मागणी : रहिवाशांचे मुख्यमंत्र्यांना पत्र….
मुंबई, दि.१२ : मंगेश म्हात्रे
धारावी पुनर्विकास प्रकल्पातील (डीआरपी) पूर्वीच्या सेक्टर १ मधील चाळी व इमारतींच्या सर्वेक्षणाकडे डीआरपी प्रशासनाने पाठ फिरवली आहे. सर्वेक्षण करण्यास रहिवाशांचा विरोध नसतानाही डीआरपीने येथील घरांचे सर्वेक्षण केलेले नाही. सेक्टर १ मधील चाळी इमारतींमधील घरांचे सर्वेक्षण करून चाळींमधील पोटमाळ्यावर राहणार्या कुटुंबांना मोफत घर देण्याची मागणी डीआरपी सेक्टर १ रहिवाशी संघ या संघटनेने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
राज्य सरकारने धारावीचा पुनर्विकास करण्यासाठी धारावी पुनर्विकास प्रकल्पा (डीआरपी) मार्फत अदानी समुहाच्या नवभारत मेगा डेव्हल्पर्स प्रायव्हेट (एनएमडीपीएल) या कंपनीची निवड केली आहे. डीआरपी आणि एनएमडीपीएल संयुक्तपणे हा प्रकल्प राबवत आहे. कंपनीमार्फत धारावीतील झोपड्यांची घरोघरी जाऊन पात्रता सर्वेक्षण मोहिम राबविण्यात येत होती. या दरम्यान सेक्टर १ मधील काही झोपड्यांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. तर काही झोपड्या, दुकानांचे सर्वेक्षण करण्यात आले नाही. त्याचप्रमाणे चाळी आणि इमारतींमध्ये घरांचेही सर्वेक्षण केलेले नाही. अशातच डीआरपीने घरोघरी जाऊन होणार्या सर्वेक्षणाला १२ ऑगस्ट रोजी पूर्णविराम दिला आहे.
यामुळे सेक्टर १ मधील रहिवाशी संतप्त झाले आहेत.
धारावी प्रकल्पातील मुंबई महानगरपालिकेच्या मालमत्ता विभागाच्या जमीनीवरील चाळी व इमारतींचे सर्वेक्षण करण्यास रहिवाशांचा विरोध नसताना सर्वेक्षण केले नाही. त्यामुळे चाळी इमारतींनामधील घरांचे तातडीने सर्वेक्षण करावे अशी मागणी डीआरपी सेक्टर १ रहिवाशी संघाने मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली आहे.
धारावीतील झोपड्यांच्या वरच्या मजल्यावर किवा पोटमाळ्यावर राहणार्या कुटुंबीयांना घरे देण्यात येत आहेत. मात्र सेक्टर १ मधील चाळींच्या पोट माळ्यावर राहणार्या कुटुंबीयांना घर नाकरण्यात येत आहे. हा सेक्टर १ मधील रहिवाशांवर अन्याय आहे.चाळीमधील पोटमाळ्यावर वास्तव्यास असणार्या कुटुंबांनाही हक्काचे मोफत घर द्यावे, अशी मागणी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात केली असल्याचे डीआरपी सेक्टर १ रहिवाशी संघाचे निमंत्रक आशिष मोरे यांनी सांगितले.
———————-
चाळी इमारतीमधील रहिवाशांना ७५० चौरस फुटाचे घर द्या…
धारावीतील झोपडीधारकांना घर देण्यात येत आहे. मात्र सेक्टर १ मधील जुन्या चाळी आणि इमारतीमधील रहिवाशांना ४०५ चौरस फुटाचे घर देऊन अन्याय करण्यात येत आहे. चाळी इमारतीमधील रहिवाशांना ७५० चौरस फुटाचे घर मिळावे, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली असल्याचे डीआरपी सेक्टर १ रहिवाशी संघांचे निमंत्रक अनिल भंडारे यांनी सांगितले.




















