कोपरगाव, दि.३० : दिलीप गायकवाड
रयत शिक्षण संस्थेच्या गुरुवर्य तुकाराम बाबा विद्यालय, कुंभारी येथे धमाल, मजा, मस्ती आणि मनोरंजनासोबतच बौद्धिक खेळ व व्यावसायिक शिक्षणाचा संगम साधणारा “बाल आनंद मेळावा” नुकताच उत्साहात पार पडला.

या मेळाव्यात इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी एकूण २७ स्टॉल उभारले होते. यामध्ये ४७ विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग होता. विविध कल्पक स्टॉल, खेळ, खाद्यपदार्थ व उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांसह पालकांनीही मेळाव्याचा मनमुराद आनंद घेतला.
मेळाव्याचे उद्घाटन गावच्या प्रथम नागरिक सौ. देवयानीताई घुले यांच्या हस्ते झाले. यावेळी उपसरपंच सौ. नीलंकठ ताई उपस्थित होत्या. पालकांनी विविध स्टॉलना भेट देत विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचे कौतुक केले.
याप्रसंगी स्कूल कमिटीचे अध्यक्ष रामराव बाबुराव साळुंखे पाटील, स्थानिक सल्लागार समिती सदस्य गोपीनाथ नीळकंठ व पैठणेआप्पा, तसेच कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक प्रशांत घुले यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवला.
हा बाल आनंद मेळावा यशस्वी करण्यासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व पालकांनी उत्स्फूर्त सहकार्य केले. त्यामुळे मेळावा आनंददायी व प्रेरणादायी वातावरणात यशस्वीरीत्या संपन्न झाला.


















