दिपालीताई उदावंत यांचा शिक्षण समिती सभापतीपदाचा अभिनव पदभार स्वीकार
कोपरगाव : दिलीप गायकवाड
कोपरगाव शहरात शिक्षण व पर्यावरणाचा संदेश देणारी ‘ग्रंथ व वृक्ष दिंडी’ काढत नवनियुक्त सभापतींनी पदभार स्वीकारल्याने परिसर दुमदुमला. कोपरगाव नगरपरिषदेच्या शिक्षण, क्रीडा व सांस्कृतिक समितीच्या नवनियुक्त सभापती दिपालीताई संजय उदावंत यांनी पारंपरिक पद्धतीऐवजी अभिनव उपक्रम राबवत पदभार स्वीकारला.

कोपरगाव नगरपरिषदेच्या माधवराव कचेश्वर आढाव पाटील विद्यालयाच्या प्रांगणातून
दिंडीची सुरुवात झाली. ग्रंथांची आकर्षक पालखी सजवण्यात आली होती. विद्यार्थ्यांनी हातात ग्रंथ, पर्यावरण जनजागृतीचे फलक आणि विविध रोपे घेतली होती. लेझीम पथक, ढोल-ताशांचा गजर आणि विद्यार्थ्यांच्या घोषणांनी संपूर्ण परिसर उत्साहाने भारावून गेला.
दिंडी भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालय कोपरगांव नगरपरिषद संचलित येथे पोहोचल्यावर दिपालीताई उदावंत यांनी तेथील कामकाजाची पाहणी करत पदभार स्वीकारला. खुर्चीवर बसून औपचारिक पदभार न स्वीकारता, प्रत्यक्ष शैक्षणिक उपक्रमातून कामाची सुरुवात केल्याने त्यांच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
पदभार स्वीकारल्यानंतर बोलताना उदावंत म्हणाल्या, “केवळ पद भूषवणे हा उद्देश नसून शिक्षण, क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रात प्रभावी व परिणामकारक उपक्रम राबवणे हा आमचा संकल्प आहे.” विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच डिजिटल शिक्षणावर भर दिला जाईल. वर्गखोल्यांची रंगरंगोटी, पिण्याच्या पाण्याची सुविधा आणि स्वच्छतागृहांच्या दुरुस्तीला प्राधान्य देण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच शहरात वाचन संस्कृती वृद्धिंगत करण्यासाठी आणि पर्यावरण संतुलनासाठी वृक्षारोपण मोहिमा राबविण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी नवनियुक्त सभापतींचा शाल व ग्रंथ भेट देऊन सत्कार करण्यात आला.
नगराध्यक्ष पराग संधान यांनी उदावंत ताई यांचे अभिनंदन करताना सांगितले की, माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे यांच्या संकल्पनेतून नगरपालिकेत महिलांना मोठ्या प्रमाणावर संधी देण्यात येत असून सध्या ४ ते ५ सभापती महिला आहेत. उदावंत यांनी पदभार स्वीकारण्यापूर्वीच नगरपालिकेच्या आठ शाळा व एका माध्यमिक विद्यालयाच्या अडचणी जाणून घेतल्याबद्दल त्यांनी विशेष कौतुक केले. शाळांची पटसंख्या वाढविणे तसेच शाळा बसेसच्या डिझेल समस्येसाठी अर्थसंकल्पात विशेष तरतूद करण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भावना गवांदे यांनी केले, तर आभार प्रदर्शन संजय उदावंत यांनी केले. उपनगराध्यक्ष जितेंद्र रणशूर व नगरसेवक संतोष शिंदे यांनीही मनोगत व्यक्त केले.
या सोहळ्यास बाळकृष्ण उदावंत, मुकुंद उदावंत, संतोष देवळालीकर, सचिन उदावंत, विजय उदावंत, सागर देवळालीकर, नवनाथ उदावंत तसेच विविध शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक आणि नगरपरिषदेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दिंडीच्या माध्यमातून कोपरगावकरांना भारतरत्न डाॅ बाबासाहेब आंबेडकर वाचनालय येथील तसेच स्पर्धा परीक्षा )(एमपीएससी/यूपीएससी) अभ्यासिकेचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.




















