कोपरगाव, दि.९. प्रतिनिधी
जागतिक महिला दिनानिमित्त ग्रामीण भागात आरोग्य सेवेत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मुकता सोमनाथ केकाने यांच्या कार्याची विशेष दखल घेतली जात आहे. सिन्नर तालुक्यातील रा. निराळे येथील अतिशय साध्या आणि गरीब कुटुंबातून येत त्यांनी शिक्षणाच्या जोरावर आरोग्य सेवेत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी नाशिक येथे पुढील शिक्षण घेतले. त्यानंतर १८ ऑगस्ट २००६ रोजी आरोग्य सेविका (परिचारिका) म्हणून त्यांनी सेवेला सुरुवात केली. आजपर्यंत जवळपास २० वर्षे त्यांनी दुर्गम आणि ग्रामीण भागात अत्यंत प्रामाणिकपणे सेवा बजावली आहे.
त्यांनी काम सुरू केले त्या काळात मोबाईल, इंटरनेट किंवा लॅपटॉपसारख्या सुविधा उपलब्ध नव्हत्या. तरीही समाजाशी असलेली बांधिलकी आणि गोरगरीब जनतेची सेवा करण्याचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून त्यांनी सातत्याने काम केले. दुर्गम खेड्यांमध्ये घरोघरी जाऊन नागरिकांच्या आरोग्याच्या समस्या समजून घेणे, महिलांची तपासणी करणे, वयोवृद्धांची काळजी घेणे तसेच बालकांना लसीकरण व औषधे देणे अशा विविध माध्यमातून त्यांनी समाजसेवा केली.
सध्या त्यांची बदली त्र्यंबकेश्वर तालुक्यातील आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत सापगाव उपकेंद्र येथे झाली असून तेथेही त्या तितक्याच समर्पितपणे सेवा देत आहेत.
महिलांची जिद्द आणि कर्तृत्व कसे असते याचे जिवंत उदाहरण म्हणजे मुकता केकाने यांचा २० वर्षांचा सेवाभावी प्रवास होय. त्यांच्या या कार्याबद्दल जागतिक महिला दिनानिमित्त त्यांना भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देण्यात येत आहेत.




















