साईबाबा कॉर्नर चौकातील वाहतूक कोंडी, अपघात आणि खड्ड्यांच्या समस्येवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी; अन्यथा तीव्र जनआंदोलनाचा इशारा
कोपरगाव,दि.३०.( दिलीप गायकवाड )
कोपरगाव शहरातील साईबाबा कॉर्नर चौकात कायमस्वरूपी ट्रॅफिक सिग्नल बसवण्याची जबाबदारी नेमकी सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) की राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) यापैकी कोणाची, याचा थेट जाब ‘माझं गाव माझा अभिमान’ संघटनेने प्रशासनाला विचारला आहे. याबाबतचे निवेदन तहसीलदार, PWD उपअभियंता आणि कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात सादर करून ४८ तासांत ठोस निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली आहे.
संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, जानेवारी २०२६ मध्ये पुणतांबे फाटा ते येसगाव हा रस्ता PWD कडून NHAI कडे हस्तांतरित करण्यात आला आहे. मात्र, साईबाबा कॉर्नर येथे ट्रॅफिक सिग्नल उभारण्याबाबत दोन्ही विभागांकडून जबाबदारी एकमेकांवर ढकलली जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या चौकात दररोज मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत असून अपघातांचे प्रमाणही वाढत आहे. त्यामुळे सिग्नल बसवण्याची जबाबदारी तातडीने निश्चित करून प्रत्यक्ष काम सुरू करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
जोपर्यंत कायमस्वरूपी सिग्नल कार्यान्वित होत नाही, तोपर्यंत सकाळी व संध्याकाळी शाळा-महाविद्यालयांच्या वेळेत वाहतूक पोलीस किंवा होमगार्डची नियुक्ती करण्यात यावी, अशीही मागणी संघटनेने केली आहे.
पावसाळ्यात रस्त्यावर पडलेल्या मोठ्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांना मोठा धोका निर्माण झाला असून, साचलेल्या पाण्यामुळे अपघातांची शक्यता वाढली आहे. त्यामुळे खड्डे तातडीने दर्जेदार पद्धतीने बुजवून रस्ता सुरक्षित करावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
संघटनेचे म्हणणे आहे की, यापूर्वी अनेक निवेदने देऊन तसेच ‘दशक्रिया विधी आंदोलन’ करूनही प्रशासनाने कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही. त्यामुळे पुढील ४८ तासांत सिग्नल उभारणी व रस्ता दुरुस्तीची प्रत्यक्ष कामे सुरू न झाल्यास ‘माझं गाव माझा अभिमान’ संघटना आणि नागरिकांच्या वतीने तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा विनय भगत, मयूर आव्हाड, अमित आव्हाड, विजय जाधव आणि संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.




















