” चलो बोधगया – १८ मार्च “
डॉ. भीमराव य. आंबेडकर यांचे बौद्ध बांधव आणि सामाजिक संघटनांना महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन
मुंबई, दि. १४ ( अजय मगरे )
बिहार, बोधगया येथील महाबोधी महाविहार आजही हे पवित्र स्थळ बौद्ध समाजाच्या नियंत्रणात नाही. हे स्थळ बौद्ध समाजाच्या ताब्यात यावे आणि बोधगया मंदिर कायदा (B.T. Act) १९४९ रद्द करण्यात यावा, यासाठी ऑल इंडिया बुद्धिस्ट फोरम, बौद्ध समाज व विविध संघटनांच्या नेतृत्वाखाली बुद्धगया मुक्ती आंदोलन उभारण्यात आले आहे.
याच लढ्याला आणखी बळ देण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू, डॉ. भीमराव यशवंतराव आंबेडकर (विश्वस्त/राष्ट्रीय कार्याध्यक्ष, समता सैनिक दल) हे १८ आणि १९ मार्च २०२५ रोजी महाबोधी महाविहार, बोधगया येथे होणाऱ्या आंदोलनाचे नेतृत्व करणार आहेत. भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने संपूर्ण देशभरातील बौद्ध बांधव आणि सामाजिक न्यायासाठी लढणाऱ्या सर्व संघटनांनी मोठ्या संख्येने या ऐतिहासिक आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
१२ फेब्रुवारी २०२५ पासून अखिल भारतीय बौद्ध मंचातर्फे महाबोधी महाविहार, बोधगया येथे अनिश्चितकालीन उपोषण व धरणे आंदोलन सुरू आहे. देशभरातून या आंदोलनाला मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळत असून, बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया आणि समता सैनिक दलाने अधिकृत पाठिंबा जाहीर केला आहे.
२७ फेब्रुवारी २०२५ रोजी संपूर्ण देशभरात बोधगया मुक्तीसाठी जोरदार निषेध आंदोलन छेडण्यात आले. याअंतर्गत, राष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल आणि मुख्यमंत्री (बिहार सरकार) यांना निवेदने पाठवण्यात आली. तसेच, स्थानिक प्रशासन, जिल्हाधिकारी, पोलीस स्टेशन आणि तहसील कार्यालयांना मोठ्या प्रमाणावर निवेदने सादर करण्यात आली.
१२ मार्च रोजी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली आणि डॉ भीमराव य. आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल आणि वंचित बहुजन आघाडीने महाराष्ट्रातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांवर मोर्चा काढला. मुंबईतील उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोरही जोरदार आंदोलन करण्यात आले.
महाबोधी महाविहार बौद्ध समाजाच्या ताब्यात देण्यासाठी १८ आणि १९ मार्च रोजी बोधगया येथे ऐतिहासिक आंदोलन होणार आहे. या आंदोलनाचे नेतृत्व डॉ. भीमराव य.आंबेडकर करणार आहेत.हे आंदोलन केवळ बोधगया मुक्तीसाठी नाही, तर बौद्ध धर्माच्या अस्तित्व आणि हक्कासाठी एक निर्णायक पाऊल आहे. त्यामुळे देशभरातील बौद्ध बांधव, सामाजिक कार्यकर्ते आणि मानवतावादी शक्तींनी मोठ्या संख्येने १८ मार्च रोजी बोधगया येथे हजर राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.




















