महारेराकडे ५० हजारांहून अधिक गृहनिर्माण प्रकल्पांची नोंदणी; महाराष्ट्र देशात अव्वल
मुंबई, दि.८ ( प्रतिनिधी )
महाराष्ट्राच्या स्थावर संपदा क्षेत्रात एक महत्त्वाचा मैलाचा दगड ठरलेली कामगिरी नुकतीच साध्य झाली आहे. महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरणाकडे (महारेरा) नोंदवलेले गृहनिर्माण प्रकल्प ५० हजारांचा टप्पा पार करत राज्याने देशात आघाडी घेतली आहे.
५०,१६२ प्रकल्पांच्या नोंदणीसह महाराष्ट्र हे देशातील एकमेव राज्य असून जिथे एवढ्या मोठ्या प्रमाणावर प्रकल्प नोंदवले गेले आहेत. त्यामागे २०१७ साली स्थापन झालेल्या महारेराची पारदर्शक कार्यपद्धती, प्रामाणिक नियमन आणि डिजिटल प्रणालीचा प्रभावी वापर ही प्रमुख कारणे आहेत.
देशभरात केवळ महाराष्ट्र असे राज्य आहे जिथे इतक्या मोठ्या प्रमाणावर प्रकल्पांची नोंदणी झाली आहे. सध्या महारेराकडे नोंदणीकृत ५०,२६२ प्रकल्प आहेत. तुलनात्मकदृष्ट्या, तामिळनाडूत २७,६०९ आणि गुजरातमध्ये १५,३२२ प्रकल्प आहेत.
“आठवे वर्ष यशस्वीपणे पूर्ण करून नवव्या वर्षात पदार्पण करत असताना, महारेराकडे नोंदणीकृत गृहनिर्माण प्रकल्पांची संख्या ५० हजारांच्या पुढे गेली आहे, ही उद्योगस्नेही आणि सतत प्रगतीशील असलेल्या महाराष्ट्रासाठी अत्यंत आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे.”
पूर्वी केवळ मुंबई महानगर व पुणे परिसरापुरते मर्यादित असलेले स्थावर संपदा क्षेत्र आज राज्यभर विस्तारले आहे. राज्यातील सर्व भागांमध्ये घरांच्या वाढत्या मागणीतून महाराष्ट्राचा सर् समतोल विकास स्पष्टपणे दिसून येतो.
घरखरेदीदारांना कायदेशीरदृष्ट्या सक्षम करताना, त्यांना अडचणी उद्भवू नयेत यासाठी महारेरा सातत्याने दक्ष राहतो. पारदर्शकता, जबाबदारी आणि ग्राहकहित हेच आमचे केंद्रस्थानी ध्येय असून, त्यासाठी महारेरा अविरत प्रयत्नशील आहे.” असे महारेराचे अध्यक्ष मनोज सौनिक यांनी सांगितले.




















