शिर्डीत शिवसेना महिला आघाडीचा जिल्हा मेळावा २ मे रोजी
कोपरगाव : उत्तर अहिल्यानगर जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीतील भरघोस यश व विधानसभा निवडणुकीत दोन मतदारसंघांतील विजयामुळे शिवसेनेची ताकद अधिक बळकट झाली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना महिला आघाडीच्या वतीने जिल्हास्तरीय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या आदेशानुसार, तसेच शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी व राजेंद्र चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवार, २ मे रोजी दुपारी २ वाजता शिर्डी येथील शासकीय विश्रामगृहात हा मेळावा होणार आहे.
शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बाळासाहेब ठाकरे व मीनाताई ठाकरे यांचे विचार गावागावात पोहोचवण्याचे उद्दिष्ट या मेळाव्याच्या माध्यमातून आहे. महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांना संघटनात्मक कामाची दिशा देण्याच्या दृष्टीने या मेळाव्याला विशेष महत्त्व आहे.
या मेळाव्यास शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्या सौ. मीनाताई कांबळी, प्रवक्त्या व महिला संपर्क नेत्या आमदार डॉ. मनीषा कायंदे या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत. त्यांच्यासह खासदार सदाशिवराव लोखंडे, आमदार विठ्ठलराव लंघे, आमदार अमोल खताळ, सुरेखा गव्हाणे, कमलाकर कोते, नितीन औताडे, अनिता जगताप व अन्य मान्यवर पदाधिकारी यांचीही उपस्थिती अपेक्षित आहे.
या मेळाव्यास उत्तर नगर जिल्ह्यातील सर्व महिला पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा प्रमुख विमलताई पुंडे व सुनीताताई शेळके यांनी केले आहे.




















