मुंबई | प्रतिनिधी
वडाळा भारतीय कमला नगर परिसरातील रविवारी रात्री चाकूचा धाक दाखवत तीन दुकानांमध्ये दरोडा टाकून बीएसटी चाळ परिसरात दहशत माजवणारा कुख्यात नौशाद उर्फ ‘चूहा’ अखेर वडाळा ट्रक टर्मिनस पोलिसांच्या जाळ्यात अडकला. सीसीटीव्हीत कैद झालेल्या या थरारक घटनेनंतर परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. मात्र, पोलिसांनी अवघ्या काही तासांत आरोपीला गजाआड करत आपल्या तत्परतेची प्रचिती दिली.
आरोपीने धारदार चाकूचा धाक दाखवत तीन दुकानांमध्ये घुसून दुकानदारांना जीवे मारण्याची धमकी दिली. मोबाईलसह सुमारे ₹२२ हजारांचा ऐवज लुटल्यानंतर त्याने रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांनाही धमकावत परिसरात दहशत निर्माण केली. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आणि त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली.
या घटनेनंतर स्थानिक नागरिक आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शिष्टमंडळाने पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपीला त्वरित अटक करण्याची मागणी केली होती. त्यानंतर पोलिसांनी कोणताही विलंब न लावता आरोपीला बेड्या ठोकल्या.
परिमंडळ 4 चे डीसीपी अनुराग जैन यांच्या मार्गदर्शनाखाली वडाळा ट्रक टर्मिनस वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीष आवळे यांच्या नेतृत्वात पोलिसांनी तातडीने तपास सुरू करून मध्यरात्रीच नौशाद उर्फ ‘चूहा’ याला अटक केली. या वेगवान कारवाईमुळे व्यापारी आणि स्थानिक नागरिकांनी पोलिसांचे कौतुक केले आहे.
स्थानिकांच्या माहितीनुसार, आरोपीविरोधात यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल असून तो सातत्याने परिसरात दहशत माजवत होता. त्यामुळे त्याच्या अटकेनंतर नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला असून, अशा सराईत गुन्हेगारांवर आणखी कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.




















