कोपरगाव, दि.१९ : दिपक साटोटे
दहीहंडी उत्सव संपून तीन दिवस उलटूनही कोपरगाव शहरातील अनेक मुख्य रस्ते अद्याप बॅरिकेडिंग करून बंद ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे सामान्य नागरिकांना प्रचंड गैरसोय होत असून, वाहतूक कोंडी व दैनंदिन हालचालींमध्ये अडथळे निर्माण झाले आहेत.

दहीहंडी उत्सवानंतर आमदारांचा मोठा कार्यक्रम होणार असल्याने पोलिस प्रशासनाने संपूर्ण शहरात मोठ्या प्रमाणावर बॅरिकेडिंग केले आहे. मात्र या बंदोबस्तामुळे नागरिकांचे हाल झाले असून, शालेय विद्यार्थ्यांपासून व्यापारी, रुग्णवाहिका सेवा ते नोकरदार वर्ग या सर्वांनाच त्रास सहन करावा लागत आहे.
वाहतूक पोलिसांकडून “गाडी दुसऱ्या दिशेने घ्या, नाहीतर दंड होईल” अशा कठोर सूचनांमुळे नागरिकांत रोष निर्माण झाला आहे. “कार्यक्रम वेगळा आणि त्रास मात्र सामान्यांना,” अशा शब्दांत नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
शहरातील प्रमुख रस्ते तातडीने खुल्या करावेत व नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे. प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष द्यावे, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.




















