पावसाळ्यातही नागरिकांना मनस्ताप; काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी
कोपरगाव | दिलीप गायकवाड
नगर-मनमाड व शिर्डी बायपास महामार्गावरील अपूर्ण उड्डाणपुलांमुळे यंदाच्या पावसाळ्यातही वाहतूक कोंडीची समस्या कायम राहण्याची चिन्हे दिसत आहेत. केंद्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अखत्यारीतील या महामार्गावर कोपरगाव तालुक्यातील पुणतांबा फाटा आणि बेट नाका येथील उड्डाणपुलांची कामे अद्याप पूर्ण न झाल्याने वाहनचालकांसह स्थानिक नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
पुणतांबा फाटा येथील उड्डाणपुलाचे काम मोठ्या प्रमाणात पूर्णत्वाकडे गेले असले, तरी पावसाळ्यापूर्वी हा पूल वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता कमी असल्याचे दिसून येत आहे. दुसरीकडे बेट नाका येथील उड्डाणपुलाचे कामही अद्याप बऱ्याच प्रमाणात शिल्लक असून, त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यंदाही या परिसरात वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार असल्याची भीती व्यक्त होत आहे.
नगर-मनमाड महामार्ग हा शिर्डीकडे जाणाऱ्या भाविकांसह राज्यातील महत्त्वाच्या वाहतुकीचा मार्ग असल्याने येथे वाहनांची सतत वर्दळ असते. अपूर्ण कामांमुळे वाहतूक विस्कळीत होत असून, पावसाळ्यात परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता नागरिकांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, महामार्गाचे काम युद्धपातळीवर पूर्ण करून वाहतूक सुरळीत करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे. कामात होत असलेल्या विलंबाबाबत संताप व्यक्त करत बहुजन शक्ती सामाजिक संस्थेने प्रशासनाला इशारा दिला असून, महामार्गावरील कामे तातडीने पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा संस्थेने दिला आहे.
वाहतूक कोंडी, अपघातांचा धोका आणि नागरिकांचा वाढता संताप लक्षात घेता संबंधित यंत्रणांनी तातडीने हस्तक्षेप करून महामार्गावरील रखडलेली कामे पूर्ण करावीत, अशी मागणी जोर धरत आहे.




















